राज्यातील सहा ते सात मतदारसंघांतील अंतर्गत दुफाळीने काँग्रेस नेत्यांची झोप उडाली आहे. या सर्व मतदारसंघांतील सर्व गटतटांमधील वाद मिटवून बंडोबांना थंड करण्यावर सध्या भर देण्यात आला असून निकालावर या गटबाजीचा परिणाम होऊ नये यासाठी तमाम नेते कामाला लागले आहेत.
गेल्या वेळी राज्यातून काँग्रेसचे १७ खासदार निवडून आले होते. यंदा किमान १० ते १२ खासदार निवडून यावेत, असे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यापासून काँग्रेस परंपरेनुसार बंडाचे झेंडे उभे राहू लागले. उमेदवारी नाकारण्यात आलेल्यांकडून अधिकृत उमेदवारांना त्रास दिला जाऊ शकतो याचा अंदाज आल्यानेच खबरदारी घेण्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भर दिला आहे. कोठे गोंजारून तर कोठे सूचक इशारे देऊन बंडखोरीचा फटका बसणार नाही, अशा दृष्टीने व्यूहरचना करण्यात येत आहे.
चंद्रपूर आणि औरंगाबाद मतदारसंघांतील गटबाजी पक्षाला त्रासदायक ठरू शकते. चंद्रपूरमध्ये पर्यावरणमंत्री संजय देवताळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या गटाने विरोधात भूमिका घेतली आहे. औरंगाबादमध्ये उमेदवार नितीन पाटील आणि गेल्या वेळी पराभूत झालेले उत्तमसिंह पवार यांच्यातील वितुष्टाने हिंसक वळण घेतले होते. नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर पवार यांनी विरोधातच भूमिका घेतली आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील विद्यमान खासदार मारोतराव कोवासे उमेदवारी नाकारल्याने संतप्त आहेत. उमेदवार डॉ. नामदेव उसंडी यांचे काम करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मुख्यमंत्र्यांजवळ मांडली. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधातील नेते आणि कार्यकर्त्यांनी असहकार पुकारला आहे. भिवंडीत खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज आहेत, तर नागपूरमध्येही पक्षांतर्गत गटबाजी विलास मुत्तेमवार यांना त्रासदायक ठरत आहे.
पुणे मतदारसंघात सुरेश कलमाडी कोणती भूमिका घेतात याकडे काँग्रेस नेत्यांचे जास्त लक्ष होते. त्यांच्यावरील खटले किंवा एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांनीही उघडपणे पक्षाशी पंगा घेण्याचे टाळले आहे. कलमाडी यांनी विश्वजित कदम यांना उघडपणे पाठिंबा दर्शविला असला तरी पडद्याआडील त्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची असेल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. उमेदवारी नाकारण्यात आलेले विनायक निम्हण, मोहन जोशी आदी नाराज आहेत. पुण्यात अंतर्गत दुफाळीचा फटका बसू नये म्हणून सर्व नेत्यांशी मुख्यमंत्री चर्चा करीत आहेत. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार मुन्ना महाडिक आणि काँग्रेसचे स्थानिक नेते व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न बरेचसे यशस्वी झाल्याचे सांगण्यात येते.