केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या जात असताना अशा कार्यक्रमावर काँग्रेस आघाडी सरकार बहिष्कार टाकून निषेध करीत असेल तर तो जनतेपासून पळवाट काढण्याचा प्रकार असल्याचे मत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पारडी उड्डाण पुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला असला तरी हा बहिष्कार म्हणजे काँग्रेसचे अपयश आहे. जनता स्वीकारत नाही, त्याचे हे द्योतक आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम भाजपचा नव्हता. तो राज्य व केंद्र सरकारचा होता. नागपुरातच माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी काँग्रेस नेत्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्री यापुढे नागपूरमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
माधव भंडारी यांच्यासह निवडणूक संचालन समितीचे प्रमुख श्रीकांत भारती, खासदार हंसराज अहीर व अन्य खासदार, आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. बैठकीत १२० मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यात १८ विभाग करण्यात आले आहेत. समितीने संपूर्ण राज्यात मेळावे घेणे सुरू केले आहे. नागपूरनंतर मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेशचे दौरे करणार आहे. केंद्रातील मंत्री, पक्षाचे विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री प्रचारासाठी विविध मतदारसंघांत जातील. राज्य पातळीवर एक जाहीरनामा राहणार असला तरी प्रत्येक जिल्ह्य़ात स्थानिक पातळीवर पक्षातर्फे जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले. या वेळी गिरीश व्यास उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा