लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाटे’चा अंदाज न आल्याने पालापाचोळ्यासारखी उडून गेलेल्या काँग्रेसमध्ये आता विरोधी पक्षनेत्याचा शोध सुरू झाला आहे. पक्षातील एका गटाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता बनवण्याची मागणी केली असली तरी आई सोनियांचा त्यास विरोध आहे. लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशामुळे आक्रमक झालेल्या भाजपसमोर राहुल गांधी यांचा लोकसभेत निभाव लागणार नसल्याची भीती सोनिया गांधी यांना आहे. त्यात अवघे ४४ खासदार निवडून आल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसला भाजपशी विशेषत: मोदींशी वाटाघाटी कराव्या लागतील. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविले जाऊ शकते, असा दावा पक्षसूत्रांनी केला.
कमलनाथ संपुआ सरकारच्या काळात संसदीय कामकाज मंत्री होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा सर्वच पक्षांच्या नेत्यांशी संपर्क होता. त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी पक्षाच्या एका गटाने सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. मात्र कमलनाथ यांच्या नावावर एकमत न झाल्यास खुद्द सोनिया गांधी याच विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारतील. दरम्यान, काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी जनतेसमोर पराभवाचे खापर फोडणे बंद करा, अशी समज पक्षनेत्यांना दिली. जनतेमध्ये आपल्याविरोधात मोठय़ा प्रमाणावर असंतोष होता. तो ओळखण्यात आपण अपयशी ठरलो. इतक्या मोठय़ा पराभवातून वैयक्तिक व सामूहिक धडा घ्या, असा सल्ला सोनिया गांधी यांनी दिला. पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना एकत्र घेऊन भक्कम विरोधकाची भूमिका वठविण्याचा प्रस्ताव समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
दरम्यान, सोनिया गांधी यांना सभागृह नेतेपदी निवडण्यात आले. आपल्या पारंपरिक मतदारांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात भाजप बेजबाबदारपणे वागल्याचा आरोप करीत त्या म्हणाल्या की, अनेक महत्त्वाच्या विधेयकांना भाजपने अकारण विरोध केला. विकासाकडे कानाडोळा करून भाजपने निव्वळ राजकीय संधिसाधूपणाची भूमिका विरोधी बाकांवर असताना निभावली.
काँग्रेसला विरोधी पक्षनेता मिळेना.!
लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाटे’चा अंदाज न आल्याने पालापाचोळ्यासारखी उडून गेलेल्या काँग्रेसमध्ये आता विरोधी पक्षनेत्याचा शोध सुरू झाला आहे.
First published on: 25-05-2014 at 03:49 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress not getting opposition leader