पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच भाजपला रोखण्याच्या उद्देशाने पालघर (राखीव) लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय शनिवारी घेतला. परिणामी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना माघार घ्यावी लागणार आहे.
पालघर मतदारसंघात गेल्या वेळी बहुजन विकास आघाडीचे बाळाराम जाधव निवडून आले होते आणि त्यांनी यूपीए सरकारला पाठिंबा दिला होता. यंदाही ठाकूर यांनी काँग्रेसबरोबर लढण्याची तयारी दर्शविली होती, पण त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट काँग्रेसकडून घालण्यात आली. ठाकूर यांनी चिन्हावर लढण्यास नकार दिला होता. अखेर काँग्रेसने आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली. गावित यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत वसईमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावाही पार पडला़  काँग्रेस उमेदवाराचा निभाव लागण्याबाबत साशंकता होता. त्यामुळे शनिवारी सकाळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली. यापुढेही काँग्रेसबरोबर राहण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले. त्यानंतरच काँग्रेसने ठाकूर यांना पाठिंब्याचा निर्णय घेतल्याचे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress on back foot in palghar
Show comments