भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि लालबहादूर शास्त्री या काँग्रेसजनांची उदाहरणे देऊन काँग्रेसवर टीका करताना दिसले, तर काँग्रेसनेही आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २००२ सालातील मोदींबद्दलच्या विधानाला उजाळा देऊन मोदींवर शरसंधान केले आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर वाजपेयींचे छायाचित्रासह एक लेख प्रसिद्ध केला आहे. यात वाजपेयींनी २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात आपले विधान स्पष्ट केले होते.
वाजपेयी म्हणले होते की, “राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने राजधर्माचे पालन केले पाहिजे. भाजपच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यासाठी कोणताही धर्म, जात मोठी किंवा लहान असता कामा नये. त्याने प्रत्येकवेळी राजधर्माचे पालन करायला हवे.” यावेळी वाजपेयींच्या समवेत नरेंद्र मोदीही उपस्थित होते. वाजपेयी राजधर्माचे पालन करण्याच्या वक्तव्यावर भर देत असताना मोदींनीही मध्येच हस्तक्षेप करत ‘हम भी वही कर रहे हे साहब’ असे म्हटले.
यावरून काँग्रेसने आपल्या संकेतस्थळावरून, “माजी पंतप्रधान वाजपेयींना जो व्यक्ती मुख्यमंत्री पदासाठी देखील योग्य वाटत नाही, अशा व्यक्तीच्या हातात देशाचे भविष्य जनता कसे देईल?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अटलजी त्यावेळी नक्की काय म्हणाले होते? याचा व्हिडिओ-