यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची बाजू कमकुवत आहे. मात्र, असे असले तरी कमकुवत संघही मोठय़ा स्पर्धेत बाजी मारतोच त्यामुळे सोळाव्या लोकसभेत पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी येथे व्यक्त केला. जयललिता यांचा अण्णाद्रमुक हा पक्ष म्हणजे भाजपचा ‘ब’ दर्जाचा संघ असल्याची टीकाही त्यांनी केली.
चिदम्बरम यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी येथे फोडला. लोकसभा निवडणुकीत यंदा काँग्रेसची बाजू लंगडी असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. सरकार स्थापण्यासाठी लागणारे आवश्यक संख्याबळ जमा करण्याइतपतही काँग्रेस कामगिरी करू शकेल की नाही, अशी शंका वाटत असल्याचे ते म्हणाले. परंतु मोठय़ा स्पर्धेत कमकुवत संघही बाजी मारून जातात, तसेच काँग्रेसचेही होईल कारण प्रतिस्पर्धी एवढा तुल्यबळ नाही. त्यामुळे आगामी लोकसभेत केंद्र सरकार काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचेच असेल असा विश्वास चिदम्बरम यांनी व्यक्त केला. केंद्राच्या आर्थिक धोरणांचा तो विजय असेल असेही ते म्हणाले. तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमुकवर त्यांनी सडकून टीका केली. भाजपचा हा तामिळनाडूतील ‘ब’ दर्जाचा संघ असल्याचे चिदम्बरम म्हणाले. भाजपला येनकेनप्रकारणे नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवायचे असल्याने त्यांना तामिळनाडूतील दलित, मागासवर्गीय , अल्पसंख्याक यांची मते मिळवायची आहेत, त्यासाठीच त्यांनी जयललितांशी युती केली असल्याचे चिदम्बरम म्हणाले.