राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आक्रमक व्हायचे आणि दिल्लीतील नेतृत्वाने राष्ट्रवादीपुढे सपशेल नांगी टाकायची हे जणू काही समीकरणच तयार झाले आहे. राष्ट्रवादीने माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने मोठा भाऊ या नात्याने विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने गुरुवारी माघार घेतली आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झाली.
माघार घ्यायची नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. पक्षाच्या नेत्यांच्या बुधवारच्या बैठकीतही हाच सूर होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली असता, राष्ट्रवादीने माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.  शेवटी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्यापुढे नमते घेतले. मोहन जोशी यांना माघार घेण्याचा निरोप देण्यात आला.
काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया
विधानसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे आवश्यक असतानाच राष्ट्रवादीच्या दबावापुढे नेतृत्वाने माघार घेतल्याने पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मात्र संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. माघार घेऊन टीकेचे धनी होण्यापेक्षा निवडणूक लढवावी, असे मत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही बुधवारी मांडले होते. पण दिल्लीतील नेत्यांनी माघार घेण्यास भाग पाडल्याने नेतेमंडळींनी मौन बाळगणे पसंत केले. पोटनिवडणुकीत पराभव झाला असता तर त्याचे सारे खापर मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर फोडून पक्षाचे नेते मोकळे झाले असते. यातूनच मुख्यमंत्र्यांनीही सावध भूमिका घेतली.
काँग्रेसच्या हाती काय लागले ?
विधानसभेच्या जागावाटपात निम्म्या जागांची मागणी पूर्ण करता येणार नाही, असे काँग्रेसने आधीच स्पष्ट केले आहे. गत वेळच्या तुलनेत १० ते १२ जागा जास्त सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. जागावाटपातही निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागा राष्ट्रवादीचे नेते हुशारीने सोडवून घेतील, अशीच चिन्हे आहेत. बदलत्या परिस्थितीत जागावाटपात आम्हाला जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी स्पष्ट केले. एकूणच विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीने आपला वरचष्मा राहील याची पुरेशी खबरदारी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा