लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर येत्या ५ आणि ६ मार्च रोजी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून यादरम्यान शहापूरमध्ये ६ मार्चला होणाऱ्या सभेस मोठी गर्दी व्हावी म्हणून जिल्ह्य़ाच्या विविध भागांमधून तसेच नाशिक व रायगडमधून बस गाडय़ांची व्यवस्था करण्यात येणार आहे. गाडय़ा भरून आणून सभेस मोठी गर्दी होईल याची काळजी घ्या अशा सूचना शुक्रवारी दस्तुरखुद्द राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी शहापूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.
शहापूरमधील या सभेत काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण सभेची जागा निश्चित करण्यासाठी शुक्रवारी राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे शहापुरात आले होते. राज्याच्या दौऱ्यात शहापूरबरोबरच औरंगाबाद, मुंबई तसेच सांगली या ठिकाणीही राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत.
शहापूर येथील वासिंद भागात माणिकराव ठाकरे आणि राधाकृष्ण विखे-पाटील हे दोघे  झाले. त्यानंतर राहुल गांधी यांच्या सभेसाठी जागा निश्चित करण्यासाठी ते शहापूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या धसई येथे गेले. पण, वाहनामधून खाली न उतरताच त्यांनी विस्तीर्ण पठार पाहिले आणि मैदानात गर्दी दिसेल, अशी जागा पाहिजे असल्याची अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते.

Story img Loader