विविध विभागांतील तब्बल सहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे पालिकेच्या कामाचा खोळंबा होऊ लागला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांअभावी नागरी सेवांवर परिणाम होईल, अशी चिंता नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीमध्ये व्यक्त केली.
जल विभागातील अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी गेल्यामुळे दादरमधील फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीला विलंब झाला. त्यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय झाला. जल विभागातीलच नव्हे तर घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांनाही निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आल्याची माहिती नगरसेवकांनी या बैठकीत दिली. महत्त्वाच्या विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविल्यास नागरी सुविधांवर परिणाम होतील, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली.
अत्यावश्यक सेवा विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी घेऊ नये, अशी विनंती पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन करावी, अशी मागणीही नगरसेवकांनी या वेळी केली.
पालिकेकडे आठ हजार कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. त्यांपैकी केवळ पाच हजार कर्मचारी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र आतापर्यंत सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांना या कामासाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरित कर्मचारी इतर यंत्रणांमधून घेतले जातील. मात्र तरीही आणखी दहा-बारा दिवस या कर्मचाऱ्यांना ही कामे करावीच लागतील. त्यानंतर ते पालिकेच्या सेवेत रुजू होतील, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी स्पष्ट केले.