प्रत्येक लोकसभा निवडणुकीत नवीन खासदार निवडणाऱ्या ईशान्य मुंबई मतदारसंघात यावेळी पुन्हा चमत्काराची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांनाच पुन्हा एकदा आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यांना भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार किरीट सोमय्या व आम आदमी पक्षाच्या मेधा पाटकर यांच्याशी टक्कर घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील हा एकमेव मतदारसंघच गोठवण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. त्यांच्या मोहिमेला पाटकर यांच्या उमेदवारीने बळ मिळाल्याने लढत चुरशीची होणार यात शंका नाही.
२००९च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि मनसेला या मतदारसंघातील दोन तृतीयांश मते मिळाली आहेत. गुजराती मतदार भाजपच्या पारडय़ात आपली मते १०० टक्के टाकणार हे स्पष्ट असून शिवसेना-रिपाइंबरोबरच मनसेचाही पाठिंबा मिळण्याच्या आशेने सोमय्या यांचा आत्मविश्वास वाढला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून मनसेचा मराठी बाणा हायजॅक करत मराठी विरुद्ध गुजराती मतविभाजनाचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे.
मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर (पूर्व व पश्चिम) आणि शिवाजीनगर- मानखुर्द अशा सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात आघाडीचा आमदार नाही. मनसेचा जोर असूनही तेथे राज ठाकरे यांनी उमेदवार न दिल्याने सोमय्याना संजीवनी मिळाली आणि राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी पडले. मनसेची अनुपस्थिती आणि मोदी लाट यामुळे ही जागा कायम राखण्यासाठी संजय पाटील यांना जिवाचे रान करावे लागत आहे. त्यातच ‘आप’च्या मेधा पाटकर काहींशा कमकुवत उमेदवार वाटत असल्या तरी त्यांनाही झोपडपट्टी भागांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वेळी मनसेने केलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती यावेळी पाटकर यांनी केल्यास त्याचा फटका पाटील यांना अधिक बसणार. त्यामुळे झोपडपट्टीवासीय आणि मुस्लिमांची किती मते पाटकरांच्या खात्यात जमा होतात त्यावरच पाटील आणि सोमय्या यांच्या विजयाचे गणित अवलंबून असेल. एकंदरीत आपच्या साथीमुळे भाजपचे कमळ फुलते की मराठय़ांच्या वज्रमुठीमुळे घडय़ाळाचा पुन्हा गजर होतो याचा फैसला १६ मे रोजी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदार टक्का
* मराठी : ४०.४८ टक्के
* उत्तर भारतीय : १२.२५ टक्के
* मुस्लिम : १४ टक्के
* गुजराती : १० टक्के
महत्त्वाचे प्रश्न
* उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या
* डम्पिंग ग्राऊंड
* आरोग्य सेवा
* म्हाडा पुनर्विकास
* वनजमिनीवरील अतिक्रमणे

मतदार टक्का
* मराठी : ४०.४८ टक्के
* उत्तर भारतीय : १२.२५ टक्के
* मुस्लिम : १४ टक्के
* गुजराती : १० टक्के
महत्त्वाचे प्रश्न
* उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या
* डम्पिंग ग्राऊंड
* आरोग्य सेवा
* म्हाडा पुनर्विकास
* वनजमिनीवरील अतिक्रमणे