मुख्य रस्त्याच्या कडेला उभे असलेले मनसेचे ‘इंजिन’..रस्त्यावर स्वागतासाठी पसरून ठेवलेली फटाक्यांची माळ..कंबरेला ढोल-ताशे बांधून उमेदवाराची वाट पाहणारे स्थानिक बेन्जो-पथक आणि आरतीचे ताट तयार ठेवून बाकीच्या कुठे आहेत? अशी कुजबूज सुरू असलेला महिलांचा घोळका..
अंधेरी पूर्वेच्या नवपाडा एअरपोर्ट-रोडवर सकाळी साडेनऊच्या सुमारास मनसेचे उमेदवार महेश मांजरेकर यांची वाट पाहत मनसे कार्येकर्ते उभे होते..त्यानंतर साडेदहा वाजले तरी उमेदवार आला कसा नाही? अशी चर्चा हळूहळू सुरू होऊ लागली..कार्यकर्ते आपल्या पदाधिकाऱयाला गाठून मांजरेकर साहेब कुठे आहेत आता? अजून आले कसे नाहीत? अशी विचारपूर करत होता..पदाधिकारीही कोणा एका मोठ्या व्यक्तीशी मोबाईलवर बोलत असल्याच्या अविर्भावात व्यस्त होता..तितक्यात एक कार येते..त्यातून अभिनेते वैभव मांगले, आनंद इंगळे आणि पुष्कर श्रोत्री महेश मांजरेकर यांच्या प्रचारफेरीसाठी हजर होतात..अपेक्षेप्रमाणे लगेच गर्दी जमा होते..क्लिकक्लिकाट सुरू होतो..तिघेही वाट काढत चहाच्या टपरीपाशी जातात..मग टपरीवरचा चहा होतो..त्यात मांगले, ‘वा! मस्तच आहे चहा..’ म्हणून चहावाल्याचे कौतुक करतात..काहीवेळाने मनसे नेत्या शालिनी ठाकरेही आपल्या ‘इनोव्हा’ गाडीतून दाखल होतात..पाठोपाठ ‘फोक्सवॉगन’च्या आलिशान कारमधून उमेदवार महेश मांजरेकर जवळपास अकराच्या सुमारास हजर होतात..जंगी स्वागत होते…ओवाळणी होते..मांगले-इंगळे-श्रोत्री ‘नमस्कार सर’ म्हणून..मांजरेकरांना प्रतिसाद देतात..मग, मनसेचा मफलर गळ्यात घातला जातो..आणि ‘महेश मांजरेकर आगे बढो..हम तुम्हारे साथ है’, ‘दिल्लीमे ताज है..मुंबई मे राज है’, ‘एकही नारा दिसले..मनसे मनसे..’ अशा नाऱयांनी नवपाड्यातील गल्लीबोळातून प्रचाराला सुरूवात होते..
अभिनेता नेत्याच्या भूमिकेत आणि सोबत ‘स्टार’ प्रचारक असल्यामुळे बघ्यांची भरपूर गर्दी होते..त्यामुळे गल्लीबोळात महेश मांजरेकरांच्या बाजूची गर्दी बाजूला सारण्यातच कार्यकर्ते व्यस्त होतात..प्रत्येक उत्साही कार्यकर्ता मांजरेकरांना आपल्या गल्लीतून नेण्याच्या प्रयत्नात दिसतो..त्यात गल्ली-गल्लीत महेश मांजरेकर यांची ओवाळणी सुरू होते..सारख्या-सारख्या होणाऱया ओवाळणींमुळे कंटाळेपणाही मांजरेकरांच्या चेहऱयावर अलगद दिसून येतो..तरीही प्रत्येकाला प्रतिसाद देत गल्ली-बोळातील प्रचारफेरी सुरू असते..
फोटो गॅलरी: महेश मांजरेकरांची मतदारांना साद..
आनंद इंगळे, वैभव मांगले आणि पुष्कर श्रोत्रीही मतदारांना इंजिनलाच मत द्यायचं हं असे आवर्जून सांगताना दिसतात..शालिनी ठाकरेही मतदार महिलांना प्रतिसाद देत असतात..नेत्यापेक्ष्या अभिनेत्याला पाहण्याची उत्सुकता रहिवाश्यांमध्ये असल्याचेही ठळकपणे जाणवले आणि ते सहाजिकच होते..परंतु, यात मांगले-इंगळे आणि श्रोत्री यांनीही भर टाकल्यामुळे ‘स्टार’प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत होता..छोटे-खानी गल्ली-बोळ्यांतील प्रवास मुख्यरस्त्याला जोडत होता..मुख्यरस्त्यावर आधीपासूनच गाड्यांचा ताफा उभा असतो..मग पुन्हा मांजरेकर आपल्या कारमध्ये बसतात आणि प्रचारासाठी तयार केलेल्या मनसेच्या ‘इंजिन’रुपी प्रचाररथात कार्यकर्ते!..फक्त पाच मिनिटांच्या कार प्रवासानंतर प्रचाराचा पुढचा टप्पा येतो..आणि या टप्प्यातील गल्ली-बोळात पुन्हा प्रचाराला सुरूवात होते..दुपारची वेळ असल्याने रखरखत्या उन्हामुळे चेहऱयावरून वाहणाऱया घामाच्या धारा एका मोठ्या रुमालाने पुसत मांजरेकर मतदारांना हातवारे करून प्रतिसाद देत असतात..गल्ली-गल्लीत फटाक्यांची माळ आणि आरती ओवाळणीसाठी सज्ज असलेल्या महिला..असे सत्र सुरूच असते..

वस्तीतील मुलांचे ‘नया है वह’..

त्यानंतर विजयनगर परिसरात प्रचारफेरी पोहोचते..परिसराची अवस्था हलाकीची..एका बाजूला भली मोठी पाईप-लाईन..पायाखाली रेल्वेरुळ(बंद असलेला) आणि उजव्याबाजूला वस्ती..मधल्या अरूंद रस्त्यावरून प्रचारफेरी सुरू होती..एका बाजूला वस्तीतील मुले मोठ्या हुशारिने पाईपलाईनवर चढून चालू लागली (त्यांच्यासाठी नित्य-नेमाचे असावे)..मध्येच फुटलेले गटार आणि त्यावर टाकलेली लाकडी फळी यावरून प्रचार पुढे सरकत होता..इतक्यात पाईप-लाईनवरून चालणाऱया मुलांच्या टोळक्याने वैभव मांगले यांना पाहून ‘टाईम-पास’ चित्रपटातील बहुचर्चित टीप्पणी ‘नया है वह’ची घोषणाबाजी करत टिंगल-टवाळकीही केली..मग, मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना दमही भरला परंतु, उंच असलेल्या पाईप-लाईनवरून चालत असल्याने मुलेही काही भिती बाळगत नव्हते..पुढे दोन-तीनवेळा त्यांनी ‘नया है वह’ केलेचं..

प्रचाराची ‘इंजिन’ फेरी
त्यानंतर मरोळ पोलीस कॉलनीच्या गेटवर प्रचारफेरी पोहोचते..आता संपूर्ण कॉलनीत प्रचार करायचा असल्याने मांजरेकर, शालिनी ठाकरे आणि उपस्थित तीन कलावंत मनसेच्या ‘इंजिन’ रथात स्वार होतात..पुढे मनसेचे ‘बाईक’स्वार कार्यकर्ते आणि तीन मजली इमारतींच्या संपूर्ण कॉलनीत प्रचाराला सुरूवात होते..मायक्रोफोन घेऊन सर्वात पुढे चालणारा कार्यकर्ता कॉलनीत मराठी चित्रपटसृष्टीचे कलावंत आणि मनसेचे लोकसभा उमेदवार महेश मांजरेकर भेटीसाठी आल्याची घोषणाबाजी करत असतो..इतक्यात शालिनीताई मायक्रोफोनवर घोषणाबाजी करणाऱयाला मांजरेकरांनी नुसते मराठी चित्रपटसृष्टीत काम केलेले नाही याची जाणीव करून देत..चित्रपटसृष्टीचे कलावंत असे म्हण..असे ठणकावून सांगतानाही दिसल्या..
कॉलनीच्या खिडक्यांतून, गच्चीवरून बघणाऱया सर्वांना हातवारे करून प्रतिसाद देत प्रचार सुरू असतो..मध्येच एखादा चढ आल्याने इंजिनला पुढे जाण्यास अडचण होते(टेम्पोतील इंजिनची क्षमता कमी असल्यामुळे)..मग मध्येच रथावरील काहींना खाली उतरण्यास सांगण्यात आले आणि रथ हलका झाल्यानंतर मार्गस्थ होतो..अशाच प्रकारे निवडणूकीत मनसेच्या इंजिनची क्षमता किती चढाव गाठणार आहे याकडे सर्वांचे लक्ष असेल.
दुपारचे सव्वादोन वाजलेले असतात तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम असतो..त्यातील प्रत्येकाच्या मनात आपल्या परिसरात महेश मांजरेकरांना नेण्याची इच्छा घूटमळत असते..नियोजित फेरीनुसार अंतिम ठिकाण गाठले असले तरी, उत्साही कार्यकर्ता शालिनी ठाकरेंना गाठतो आणि आणखी तासभर गल्लो-गल्लीत प्रचार करूया असे सांगतो(कदाचित त्या कार्यकर्त्याच्या विभागात जायचे असेल म्हणून) यावर महेश मांजरेकर, दुपारचे दोन वाजून गेलेत आता गल्ली-बोळात प्रचार करता येणार नाही असे सांगतात आणि प्रचाराचा शेवट होतो..कॉलनीत फिरलेला रथ गेट जवळ येऊन पोहोचतो..वाहनांचा ताफा तयारच असतो..रथावरून खाली उतरून महेश मांजरेकर, शालीनी ठाकरे आणि वैभव-पुष्कर-आनंद तिघे कलाकार आपापल्या कारमध्ये बसतात..निघणार इतक्यात महेश मांजरेकर कार थांबवितात आणि विभागप्रमुखाला बोलावून घेतात..कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या सोयी-बाबत विचारपूस करतात..काच बंद होते तरीही कारभोवती लहानग्यांचा कल्ला सुरू असतो.. महेशजींची कार मार्गस्थ होते..मागे एक चिमूकला मला त्यांनी हात दाखविला असे ओरडून..आपल्या मित्रांसोबत आनंद व्यक्त करत असतो..
मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघाला यावेळी वेगळेच महत्व आहे कारण, शिवसेनेकडून गजानन किर्तीकर, काँग्रेसकडून गुरूदास कामत, मनसेकडून महेश मांजरेकर आणि ‘आप’कडून मयांक गांधी अशी चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. त्यात राष्ट्रीय आम पार्टीची स्थापना करून राखी सावंतही याच मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे जनतेचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विकासाचा मुद्दा असतो त्याच्यापेक्षाही जास्त घराघरातील ज्या समस्या आहेत. त्याकडे लक्ष केंद्रीत करणे हा महेशचा महत्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही कायम त्याच्यासाठी कायम आहोतच. कळकळीने काम करण्याची जिद्द आणि इच्छा महेशमध्ये आहे. तळमळून झोकून देऊन काम करणे हा महेशच्या कामाचा श्वास असतो. तो निवडून येईल अशी अपेक्षा आहे आणि आमच्या सर्वांचा एकच नारा आहे की, योग्य वाटत असेल तर महेशला जरूर मतदान करा पण, मतदान करा
– आनंद इंगळे

महेशजींची मेहनती वृत्ती आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, अनुभव आहे. त्यामुळे जनतेसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी महेशजीही तितक्याच तळमळीने काम करतील याचा विश्वास आम्हाला आहे. चांगले मित्र आणि आदरस्थान असल्यामुळे आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी आहोत.
– पुष्कर श्रोत्री

राजकारणापेक्षा परिश्रमी वृत्ती महेशजींमध्ये आहे आणि या परिश्रमांचे फळ जनतेच्या मतांच्या रुपात त्यांना नक्की मिळेल असा माझा विश्वास आहे.
– वैभव मांगले 

Story img Loader