अंधेरी पूर्वेच्या नवपाडा एअरपोर्ट-रोडवर सकाळी साडेनऊच्या सुमारास मनसेचे उमेदवार महेश मांजरेकर यांची वाट पाहत मनसे कार्येकर्ते उभे होते..त्यानंतर साडेदहा वाजले तरी उमेदवार आला कसा नाही? अशी चर्चा हळूहळू सुरू होऊ लागली..कार्यकर्ते आपल्या पदाधिकाऱयाला गाठून मांजरेकर साहेब कुठे आहेत आता? अजून आले कसे नाहीत? अशी विचारपूर करत होता..पदाधिकारीही कोणा एका मोठ्या व्यक्तीशी मोबाईलवर बोलत असल्याच्या अविर्भावात व्यस्त होता..तितक्यात एक कार येते..त्यातून अभिनेते वैभव मांगले, आनंद इंगळे आणि पुष्कर श्रोत्री महेश मांजरेकर यांच्या प्रचारफेरीसाठी हजर होतात..अपेक्षेप्रमाणे लगेच गर्दी जमा होते..क्लिकक्लिकाट सुरू होतो..तिघेही वाट काढत चहाच्या टपरीपाशी जातात..मग टपरीवरचा चहा होतो..त्यात मांगले, ‘वा! मस्तच आहे चहा..’ म्हणून चहावाल्याचे कौतुक करतात..काहीवेळाने मनसे नेत्या शालिनी ठाकरेही आपल्या ‘इनोव्हा’ गाडीतून दाखल होतात..पाठोपाठ ‘फोक्सवॉगन’च्या आलिशान कारमधून उमेदवार महेश मांजरेकर जवळपास अकराच्या सुमारास हजर होतात..जंगी स्वागत होते…ओवाळणी होते..मांगले-इंगळे-श्रोत्री ‘नमस्कार सर’ म्हणून..मांजरेकरांना प्रतिसाद देतात..मग, मनसेचा मफलर गळ्यात घातला जातो..आणि ‘महेश मांजरेकर आगे बढो..हम तुम्हारे साथ है’, ‘दिल्लीमे ताज है..मुंबई मे राज है’, ‘एकही नारा दिसले..मनसे मनसे..’ अशा नाऱयांनी नवपाड्यातील गल्लीबोळातून प्रचाराला सुरूवात होते..
अभिनेता नेत्याच्या भूमिकेत आणि सोबत ‘स्टार’ प्रचारक असल्यामुळे बघ्यांची भरपूर गर्दी होते..त्यामुळे गल्लीबोळात महेश मांजरेकरांच्या बाजूची गर्दी बाजूला सारण्यातच कार्यकर्ते व्यस्त होतात..प्रत्येक उत्साही कार्यकर्ता मांजरेकरांना आपल्या गल्लीतून नेण्याच्या प्रयत्नात दिसतो..त्यात गल्ली-गल्लीत महेश मांजरेकर यांची ओवाळणी सुरू होते..सारख्या-सारख्या होणाऱया ओवाळणींमुळे कंटाळेपणाही मांजरेकरांच्या चेहऱयावर अलगद दिसून येतो..तरीही प्रत्येकाला प्रतिसाद देत गल्ली-बोळातील प्रचारफेरी सुरू असते..
फोटो गॅलरी: महेश मांजरेकरांची मतदारांना साद..
आनंद इंगळे, वैभव मांगले आणि पुष्कर श्रोत्रीही मतदारांना इंजिनलाच मत द्यायचं हं असे आवर्जून सांगताना दिसतात..शालिनी ठाकरेही मतदार महिलांना प्रतिसाद देत असतात..नेत्यापेक्ष्या अभिनेत्याला पाहण्याची उत्सुकता रहिवाश्यांमध्ये असल्याचेही ठळकपणे जाणवले आणि ते सहाजिकच होते..परंतु, यात मांगले-इंगळे आणि श्रोत्री यांनीही भर टाकल्यामुळे ‘स्टार’प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत होता..छोटे-खानी गल्ली-बोळ्यांतील प्रवास मुख्यरस्त्याला जोडत होता..मुख्यरस्त्यावर आधीपासूनच गाड्यांचा ताफा उभा असतो..मग पुन्हा मांजरेकर आपल्या कारमध्ये बसतात आणि प्रचारासाठी तयार केलेल्या मनसेच्या ‘इंजिन’रुपी प्रचाररथात कार्यकर्ते!..फक्त पाच मिनिटांच्या कार प्रवासानंतर प्रचाराचा पुढचा टप्पा येतो..आणि या टप्प्यातील गल्ली-बोळात पुन्हा प्रचाराला सुरूवात होते..दुपारची वेळ असल्याने रखरखत्या उन्हामुळे चेहऱयावरून वाहणाऱया घामाच्या धारा एका मोठ्या रुमालाने पुसत मांजरेकर मतदारांना हातवारे करून प्रतिसाद देत असतात..गल्ली-गल्लीत फटाक्यांची माळ आणि आरती ओवाळणीसाठी सज्ज असलेल्या महिला..असे सत्र सुरूच असते..
त्यानंतर विजयनगर परिसरात प्रचारफेरी पोहोचते..परिसराची अवस्था हलाकीची..एका बाजूला भली मोठी पाईप-लाईन..पायाखाली रेल्वेरुळ(बंद असलेला) आणि उजव्याबाजूला वस्ती..मधल्या अरूंद रस्त्यावरून प्रचारफेरी सुरू होती..एका बाजूला वस्तीतील मुले मोठ्या हुशारिने पाईपलाईनवर चढून चालू लागली (त्यांच्यासाठी नित्य-नेमाचे असावे)..मध्येच फुटलेले गटार आणि त्यावर टाकलेली लाकडी फळी यावरून प्रचार पुढे सरकत होता..इतक्यात पाईप-लाईनवरून चालणाऱया मुलांच्या टोळक्याने वैभव मांगले यांना पाहून ‘टाईम-पास’ चित्रपटातील बहुचर्चित टीप्पणी ‘नया है वह’ची घोषणाबाजी करत टिंगल-टवाळकीही केली..मग, मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना दमही भरला परंतु, उंच असलेल्या पाईप-लाईनवरून चालत असल्याने मुलेही काही भिती बाळगत नव्हते..पुढे दोन-तीनवेळा त्यांनी ‘नया है वह’ केलेचं..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा