मुस्लिमबहुल आणि परप्रांतिय असलेल्या मालाडमधील मालवणी भागात उत्तर मुंबई मतदारसंघातील कॉंग्रेसचे विद्यमान खासदार संजय निरूपम यांच्यासोबतच्या प्रचाराचा एक दिवस.
उत्तर मुंबई मतदारसंघातील कॉंग्रेसचे विद्यमान खासदार संजय निरूपम यांना यंदाही पक्षातर्फे लोकसभेचे तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे ‘पुन्हा एकदा तुमचा आशिर्वाद हवा आहे’, अशा प्रकारचे संदेश निरूपम यांच्या प्रचाराच्या गाडीवर वाचायला मिळतात. त्यांच्याविरोधात यावेळी महायुतीचे गोपाळ शेट्टी आणि ‘आप’चे सतिश जैन उभे ठाकले आहेत. उमेदवार म्हणून सतिश जैन पूर्णत: नवीन असले तरी गोपाळ शेट्टी यांनी या विभागात केलेली कामे पाहता, काही भागात निरूपम यांच्या ‘व्होट बॅक’ला धक्का पोहचेल असा अंदाज बांधला जात आहे. विशेषत: बोरीवली आणि कांदिवली येथील गुजराती आणि जैन समाजाचा शेट्टी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. मात्र दहिसर ते मालाड अशा पसरलेल्या या मतदारसंघात झोपडपट्यांमध्ये परप्रांतीयांचेही मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे आणि निरूपम यांची खरी मदार याच मतदारांवर असणार आहे. म्हणूनच मालवणीमधील प्रचारसभेसाठी जय्यत तयारी केल्याचे दिसते.
फोटो गॅलरी : कॉंग्रेस उमेदवार संजय निरूपम यांचा मालवणीत निवडणुक प्रचार
रविवारी प्रचारासाठी हा भाग निवडला जातो. मालवणी अग्निशमन दल केंद्रासमोरील ‘कच्चा रस्ता’ नावाने ओळखल्या जाण्या-या रस्स्त्यालरील ‘झुणका भाकर केंद्रा’पाशी सकाळी साडेदहा वाजता डोक्यावर कॉंग्रेसची टोपी, कॉंग्रेसचा झेंडा असलेल्या साड्या नेसलेल्या, पंजाबी ड्रेस घातलेल्या महिला, हातात पक्षाचे झेंडे घेतलेली तरूण मुले आणि पत्रकं वाटणारी लहान मुले अशा जवळपास 200-250 कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत असते. मालवणी परिसरातील कॉंग्रेसचेच नगरसेवक आमदारही यावेळी उपस्थित असतात. सर्व व्यवस्था चोख झाली आहे ना यावर त्यांची नजर असते. मोबाईल स्पीकर व्यवस्थित चालतो की नाही याची सतत चाचणी घेतली जात असते. काही जण निरूपम यांचे स्वागत करण्यासाठी फटाक्यांच्या माळा रस्त्यावर अंथरण्यात गुंतलेले असतात. एका कोप-यात बॅँडवाले आपली जबाबदारी नेटाने पार पाडत असतात. एवढ्यात निरूपम यांची गाडी जवळ आल्याचा फोन येतो आणि घोषणाबाजीला सुरूवात होते. ‘क्यू पडे हो चक्कर में, कोई नही है टक्कर में’, ‘अपना हाथ, कॉंग्रेसके साथ’, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून जातो. पांढ-या-काळ्या रंगाच्या पजेरो गाडीतून पांढरा सदरा लेंगा घातलेले, डोळ्यावर गॉगल चढवलेले निरूपम जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा फटाक्यांची आतषबाजी सुरू होते. कार्यकर्ते पुढे सरसावतात. त्यांना पक्षाची टोपी दिली जाते आणि क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब प्रचारफेरीला सुरूवातही होते. मुस्लिमबहुल आणि परप्रांतीय असलेल्या मालाडमधील मालवणी भागातील छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून ही प्रचारफेरी जाणार असते. त्यामुळे ज्यांना या गल्ल्यांची माहिती आहे, असे कार्यकर्ते पुढे चालू लागतात. त्यांच्या मागोमाग बॅंडवाले, नगरसेवक-आमदार आणि पोलिसांच्या संरक्षणात मधोमध संजय निरूपम आणि मागे कार्यकर्त्यांचा लोंढा चालू लागतो. गल्लोगल्लीमधील लोक त्यांच्या दारात, खिडक्यांमध्ये उभे असतात. त्यांना हात दाखवत निरूपम भरभर चालू लागतात. एव्हाना अकरा वाजलेले असतात, त्यामुळे सूर्य चांगलाच आग ओकत असतो. एकमेकांवर चढवलेल्या घरांच्या बाल्कनीमध्ये लोक उभे असलेले पहायला मिळतात. त्यांच्याकडून फुलांची बरसात निरूपम यांच्यावर करण्यात येत असते. दिल्लीच्या संसदेत बसणारा नेता आपल्या गल्लीत आला आहे, हे पाहण्यासाठीचा उत्साह लोकांच्या चेह-यावर ओसंडून वाहत असतो. सांडपाण्याने भरून वाहणारी उघडी गटारं, पावलोपावली जमा करून ठेवलेल्या कच-यांवर बसलेल्या माशा आणि डास, मध्येच फिरणारे भटके कुत्रे, विजेच्या लटकणा-या तारा, रस्त्याच्यावरून टाकलेल्या पाईपलाईन या सर्वांचा सामना करत निरूपम भरभर चालत असतात. वाटेत काही बायका आरती घेऊन ओवाळायला उभ्या असतात. निरूपम तिथे थांबतात आणि यावेळीसुध्दा हातासमोरचेच बटन दाबायचे असं त्यांना आवाहनही करतात. हा सर्वच परिसर इतका गुंतागुंतीचा आहे कि, या भागाचा विकास करायचा झाला तर नक्की कसा करणार हासुध्दा विकासकासमोरचा प्रश्न आहे. सरकारने आता 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देऊ असे वचन दिले असल्यामुळे, आमचे सरकार आल्यास त्याचा या भागातील नागरिकांना सर्वाधिक फायदा होणार आहे, हे सांगायला ते विसरत नाहीत. गल्लीतील नाक्यानाक्यांवर या मतदारसंघातील लहान-मोठ्या संस्थाचे प्रमुख येऊन निरूपम यांचे हार आणि शाल देऊन स्वागत करत असतात. हातात कॉंग्रेसचे झेंडे घेऊन धावणारी मुळे ‘एक चाय दो खारी, संजय निरूपम सबसे भारी’, अशा घोषणा देत असतात. पायपीट करून निरूपम यांचा सदरा घामाने भिजलेला असतो. साहेबाची ही अवस्था पाहून एक कार्यकर्ता बाजूच्या दुकानातून थंड पाण्याची बाटली खरेदी करतो आणि त्यांना पाणी देऊ करतो. पण निरूपम ते नाकारतात आणि पुन्हा एकदा भरभर चालायला लागतात. मध्येच एका गल्लीतून जाताना, बॅंडच्या गोंधळामुळे एक महिला कुतूहलाने बाहेर येते आणि कॉंग्रेसचे झेंडे पाहून सहज म्हणून जाते.. ‘सिर्फ हात मत दिखाओ, गली के नाले तो ठिक करो पहले’. पण तिच्या बोलण्याकडे कुणाचे लक्ष नसते. याच वस्तीत राहणा-या तृतीयपंथीयांचा एक घोळका येऊन निरूपम यांचे स्वागत करतो. ‘कॉंग्रेस कि सरकारही हमारे लिए कुछ कर सकती है, इसिलिये आप ही हमारे नेता हैं’ , यामुळे निरूपम यांचा उत्साह चांगलाच वाढतो. हे तृतीपंथी नंतर काही काळ भरभर पुढे सरकणा-या यात्रेमध्ये बॅंडच्या तालावर पुढे नाचत असतात. तेव्हा मध्येच निरूपम पत्रकारांना आवर्जुन आवाज देऊन सांगतात, ‘देखो ये भी हमारे सपोर्टर है.’ साधारण दीड तास पायपीट केल्यानंतर यात्रा एका मोठ्या वस्तीत येऊन थांबते. इथे बाजूलाच गटाराचे बांधकाम सुरू असते. स्थानिक नगरसेवक आपण कशाप्रकारे जातीने लक्ष घालून हे काम मार्गी लावलं याबाबत नागरिकांना माहिती देतो. त्यानंतर निरूपम यांना बोलण्याचा आग्रह केला जातो. या भागात बिहारी मतदारांची संख्या अधिक असल्याने, निरूपम आपल्या भाषणाची सुरूवात बिहारी भाषेतच करतात. लोकांना भरघोस मतं देण्याचं आवाहन करतात. लोकांशी संवाद साधून झाल्यावर एक महिला स्वत:हून पुढे येऊन, ‘आप तो हमारे बडे भय्या है, आपको तो हक से मत मांगना चाहिए’, असं ठणकावून सांगते. तेव्हा एकच जल्लोष होतो.
या वस्तीमधील यात्रा साधारण दुपारी दोन वाजता संपते. त्यानंतर निरूपम यांना याच मतदारसंघातील एका कार्यक्रमाला जायचे असते. संध्याकाळी पुन्हा याच भागात एक चौकसभा आणि पुढील वस्तीत रॅली असते. त्यामुळे लवकरच भेटण्याचं आश्वासन देत सर्वांचा निरोप घेऊन ते आपल्या गाडीत बसून निघून जातात. हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दीही विरळ होऊ लागते.
दुपारचे कार्यक्रम आटोपल्यानंतर निरूपम यांची चार ते सात या काळात कांदिवलीतील लालजी पाडा या भागात पदयात्रा असते. या पदयात्रेलाही साधारण शंभर ते दीडशे कार्यकर्ते उपस्थित असतात. संध्याकाळी रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीत येणा-या-जाणा-यांना हात उंचावून आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करत ही पदयात्रा पुढे सरकत असते. संध्याकाळी सात वाजता मालाड विधानसभा मतदारसंघात चौक सभेच्या ठिकाणी जेव्हा निरूपम पोहोचतात तेव्हा तिथेही कार्यकत्यांनी आणि नागरिकांनी गर्दी केलेली असते. आपण गेल्या पाच वर्षात केलेल्या केलेल्या कामांची जंत्री लोकांसमोर ठेवत निरूपम पुढील पाच वर्षात काय-काय करणार याचीही आश्वासने देतात. साधारण वीस मिनिटे भाषण झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठी रॅली मालवणीच्या 1 ते 8 या सेक्टरमध्ये फिरण्यासाठी सज्ज होते. साडेसात वाजता सुरू झालेली ही रॅली रात्री साडेदहा-अकरापर्यंत चालते. शेवटच्या सेक्टरपर्यंत जेव्हा यात्रा पोहोचते तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साहसुध्दा थोडा थंडावलेला असतो. निरूपम जवळच्या महत्वाच्या लोकांशी काहीतरी चर्चा करतात आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतात. तोपर्यंत त्यांची गाडी तिथे पोहोचलेली असते. निरूपम त्यात बसून निघून जातात. कार्यकर्तेही मग आपल्या टेम्पोच्या दिशेने प्रयाण करतात. झेंडे गुंडाळले जातात, वर उंचावलेल बॅनर्स खाली येतात. दिवसाचा प्रचार संपतो तेव्हा तो भाग संपवल्याचं समाधान मागे राहिलेल्या नगरसेवक आणि आमदाराच्या चेह-यावर असतं. सर्व व्यवस्थित पार पडलं अशा प्रकारचे संवाद ऐकू येत असतात. पण ही मेहनत मतपेटीत किती उतरेल याचा निकाल 24 तारखेलाच पहायला मिळेल.