देशात सर्वाधिक मोजूनमापून बोलणारे कुणी नेते असतील, तर शरद पवार यांचेच नाव घ्यावे लागेल. साहेबांचा शब्द म्हणजे प्रमाण! साहेबांनी सांगितले नि करून दाखविले नाही, असे होत नाही. तसा त्यांचा लौकिक मोठा. एनडीएचा कारभार रालोआपेक्षा चांगला होता, असे सांगून साहेबांनी खळबळ उडवून दिली. शिवाय, मोदीभेटीच्या वृत्तावर, मी काय कुणा चिनी-पाकिस्तानी माणसाला भेटलो नाही, असे सांगून साहेबांनी बिच्चाऱ्या काँग्रेसवाल्यांची बोलती बंद करून टाकली. जिथे साहेब स्वत:च्याच पक्षातल्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवण्यास कचरत नाहीत तिथे काँग्रेस-भाजपवाल्यांची काय बिशाद? महाराष्ट्रातला प्रत्येक उमेदवार साहेबांनी निश्चित केला. प्रत्येकाची जबाबदारी घेतली. अहो, ‘आप’ला उमेदवार म्हणून हातकणंगलेमध्ये साहेबांनी विशेष लक्ष घातले. साहेब कित्ती तरी दिवसांनी जळगावला मुक्कामी थांबले. प्रचारसभा व बैठकीनंतर रावेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन व त्यांचे वडील ईश्वरलाल जैन साहेबांना भेटायला आलेत. जैन पितापुत्रांची ही ओळख अपुरी आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक, विधान परिषद निवडणुकीला ‘अर्थ’ प्राप्त करवून देणारे, अशी या पितापुत्रांची ख्याती आहे, तर जैन पितापुत्र साहेबांना भेटले. साहेब, स्थानिक नेते-कार्यकर्ते मदत करत नाहीत मनीषच्या प्रचारात- पित्याची खंत! त्यावर साहेब भडकले की. मी फक्त उमेदवारी देईन असा शब्द दिला होता, निवडून आणण्याचा शब्द नव्हता दिला. अस्सं म्हणाले हो साहेब. आता काय मी प्रत्येकाशी वैयक्तिक बोलू का मनीषसाठी? अहो, इतक्या वर्षांमध्ये मी पहिल्यांदा रावेरसाठी इतका वेळ दिलाय.. तेव्हा इथे स्थानिक ठिकाणी तुम्हीच लक्ष घाला! त्यावर मनीषदादा नि ईश्वरबाबूजींचा चेहराच पडला. त्याची चर्चा दिल्लीपर्यंत सुरू झाली. साहेबांना काँग्रेसवाले ओळखून आहेत, म्हणून साहेबांची बित्तंबातमी ठेवतात. त्यात मनीष जैन उमेदवारी मागण्यासाठी आधी काँग्रेसकडे गेले होते म्हटलं!

Story img Loader