दिल्लीतल्या गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांसाठी मावळलेले नि चालू वर्ष चांगलेच लक्षात राहील. डिसेंबरमध्ये विधानसभेची तर आत्ता लोकसभेची निवडणूक. मनसोक्त खाणं-पिणं. प्रचारासाठी ‘वेळ’ देणं. शिवाय निवडणूक पार पडली की एखाददुसरी नवी वस्तू घरात येणार, याची खात्री. दिल्ली ही तर देशाची राजधानी. त्यामुळे जे दिल्लीत ते गल्लीत. असो. वेस्ट पटेलनगरमध्ये अजय माकन यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. कार्यकर्ते नेहमीप्रमाणे चकाचक-टकाटक, ‘नेताजी’ बनून आलेले. वेस्ट पटेलनगर तसा पंजाबीबहूल भाग. सारखा गजबजलेला. दोन पावलांवर खाण्या-पिण्याचे पदार्थ. तर अजय माकन यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं.  तेवढय़ात कार्यकर्त्यांनी फर्माईश केली. कुछ नाश्ता हो जाए. पण पैसे कोण देणार? सूचना करणाऱ्याने एक कागद फाडून त्याचे पाच -सात तुकडे केले. त्यावर ‘छोले-कुलचे’ असे लिहिले नि कार्यकर्त्यांना दिले. या कागदाच्या तुकडय़ाची किंमत त्या दिवशी वीस रुपये झाली होती. शेजारी सायकलवर ‘छोले-कुलचे’ विकणाऱ्याच्या निम्म्या दिवसाची कमाई अध्र्या तासात झाली. तोच माकन साहेबांची गाडी आली. सूचनाकर्त्यांने कार्यकर्त्यांना घोषणा द्यायला सांगितली. अहो, पण कार्यकर्ते तर खाण्यात व्यस्त होते. तेव्हा सूचनाकर्त्यांनेच ‘अजय माकन जिंदाबाद-जिंदाबाद’ची घोषणा दिली. नंतर एकाची टय़ूब पेटली. अहो, हार आणलेच नाही. हाराचे पैसे ‘छोले-कुलचे’ खाण्यात गेले. तेव्हा, माकन साहेबांच्या गाडीत ठेवलेले दोन-चार हार उचलून त्यांनाच घालण्याचे सौजन्य कार्यकर्त्यांनी दाखवले. तिथं असलेल्या एका अस्सल दिल्लीकरानं त्यावर आपलं मत दिलं. ‘इस बार काँग्रेस के छोले बिक जायेंगे’. आपल्या मराठीत सांगायचं तर यंदा वाट लागणार!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा