जगातील सर्वात प्रामाणिक, निष्कलंक राजकारणी अरविंद केजरीवाल यांच्या खरेपणाला तोड नाही. त्यांचे ‘सत्याचे प्रयोग’ प्रचारसभांमध्येही सुरू असतात. स्वत:च्या कुटुंबातल्या व्यक्तींपेक्षाही केजरीवाल यांचे नरेंद्र मोदी व मुकेश अंबानी यांच्यावर प्रेम आहे. अहो, घरातल्या गोष्टी माहीत नसतील, पण मुकेश अंबानी यांची कुठे गुंतवणूक आहे, मोदी कुणाकुणाला फोन करतात, याची बित्तंबातमी केजरीवाल यांच्याकडे असते. बरं, व्यासपाठीवर कोण आहे, याची पर्वा केजरीवाल यांना नसतेच! रोहतकमधल्या सभेत केजरीवाल यांनी पत्रकार आशुतोष यांच्यावर संकटच आणले. केजरीवाल यांनी या सभेत एक किस्सा ऐकवला, तो असा. अंबानींची गुंतवणूक असलेल्या एका वृत्तवाहिनीचा पत्रकार माझ्याकडे येऊन म्हणाला, माझ्यावर मोदींच्याच बातम्या देण्यासाठी दबाव आहे. पण मला ते करायची इच्छा नाही. दबाव तर आहेच पण आर्थिक लाभ काहीही नाही. त्यामुळे मी अडचणीत आलो आहे. बिच्चाऱ्या त्या पत्रकाराला वाटले मी त्याला आर्थिक पॅकेज देईल. पण मी त्याला ‘प्रवचन’ दिले. त्याच्यातला ‘आम आदमी’ जागा केला. त्या पत्रकाराने नोकरी सोडून ‘आप’मध्ये प्रवेश केला. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे ऐकू नका. आपल्या विरोधात दाखविण्यात येणाऱ्या बातमीचा निषेध करा. तेवढय़ावर भागत नसेल तर आपण प्रसारमाध्यमांना ‘समज’ देऊ! असे हे जागतिक दर्जाचे प्रामाणिक अरविंद केजरीवाल. जेव्हा भाषणात ते ‘त्या’ पत्रकाराचा किस्सा सांगत होते, तेव्हा बिच्चाऱ्या आशुतोष यांचा चेहराच पडला. तरी बरं, केजरीवाल यांनी थेट कुणाचेही नाव घेतले नाही. पण श्रोत्यांच्या लक्षात आले. ‘आर्थिक’ लाभ न झाल्याने हळहळणारा तो पत्रकार कोण होता ते!

पवार आणि मुंडे ..
शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांमधील हाडवैर नवीन नाही. अगदी १९९५च्या निवडणुकीपूर्वी सुरू झालेले उभयतांमधील शीतयुद्ध अगदी अलीकडच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षाच्या निवडणुकीपर्यंत बघायला मिळाले. अजूनही मुंबई क्रिकेटचा वाद न्यायालयात आहे. १९९३ नंतर गोपीनाथरावांनी शरद पवार यांच्या विरोधात आरोपांची राळच उडवून दिली होती. तेव्हा मुंडे यांनी पवारांची चांगलीच दमछाक केली. काँग्रेसचा पराभव होऊन तेव्हा युतीची सत्ता आली. पवार आणि मुंडे यांच्यातील कटुता काही कमी झाली नाही. मुंडे यांचे पक्षांतर्गत विरोधक नितीन गडकरी यांचा पवारांशी चांगलाच दोस्ताना. मुंडे पवार यांना लक्ष्य करीत असताना गडकरी यांच्या विदर्भात मात्र भाजप आणि राष्ट्रवादीचे गळ्यात गळे घालणे सुरू. पवार आणि गडकरी या दोघांचाही राजकीय शत्रू समान असल्याने दोघेही मुंडे यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. पवार आणि मुंडे यांच्यात कधीच सूत जमले नाही. पण राज्याच्या पहिल्या फळीतील हे दोन्ही नेते निवडणूक आयोगाच्या कचाटय़ात अडकले. हाच उभयतांमधील तेवढाच समान धागा म्हणता येईल. गेल्या निवडणुकीत बीड मतदारसंघात साडेआठ कोटी खर्च केल्याची फुशारकी गोपीनाथरावांनी मारली आणि ते चांगलेच अडचणीत आले. निवडणूक आयोगाच्या नोटिशीमुळे अपात्रतेची टांगती तलवार आली. मुंडे यांनी नाहक वाद अंगावर ओढून घेतला. या वादात मुंडे बचावले. यासाठी मुंडे यांच्या एका मित्राची मदत कामाला आल्याची चर्चा आहे. आता दोनदा मतदान करण्याचा सल्ला देऊन शरद पवार हे असेच अडचणीत आले आहेत. सातारा आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी मतदान करावे आणि हे करताना शाई पुसावी, असा सल्लाही देण्यास पवार विसरले नाहीत. मुंडे यांच्याबाबत समजू शकते, पण पवार तोलूनमोलून बोलण्यासाठी प्रसिद्ध. शेवटी आपण विनोदाने बोललो किंवा आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, अशी सारवासारव पवारांना करावी लागली. राज्य निवडणूक विभागाने सीडी आणि सारी माहिती निवडणूक आयोगाला पाठविली आहे. आता निवडणूक आयोग पुढील निर्णय घेईल. एक मात्र झाले व त्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. ती म्हणजे पुतणे अजितदादा सुधारले तर काका म्हणजेच शरदराव बिघडले.. काही असो या विषयावर चर्चा तर सुरू झाली..