उत्तर प्रदेशात म्हशीला फारच महत्त्व आलं आहे. म्हैस म्हणजे समाजवादी पक्षाचे मोठे नेते व मंत्री आझम खान यांचे आराध्य दैवत! आझम खान यांच्या म्हशी हरवल्यानंतर म्हणे पोलिसांनी आता नवीन दल उभारले आहे. म्हैस संरक्षक दल. म्हशीच्या संरक्षणासाठी (हरवलेल्या म्हशी शोधून देण्यासाठी) समाजवादी पक्ष कटिबद्ध आहे. पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हशींच्या विकासासासाठी स्वतंत्र निधी देण्याचे आश्वासनही देण्यात येणार आहे. आम्हाला काय त्याचे? आमचे काहीच म्हणणे नाही. हे म्हणणे आहे माजी समाजवादी कॅश फॉर वोट फेम अमरसिंह यांचे. नेताजी-भय्याजींशी बिनसल्यानंतर स्वत:चे नवीन दुकान सॉरी-सॉरी नवीन पक्ष काढला अमरसिंह यांनी. पण काही उपयोग झाला नाही. पक्ष चालवायला निधी लागतो. अमरसिंह समाजवादी पक्षाचे तसे जुने-जाणते कॅशिअर. पण आता परिस्थिती बदलली होती. सध्या अमरसिंह चौधरी अजित सिंह यांच्या पक्षात सामील झालेत. त्यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशच्या जाटबहूल भागात अमरसिंह फिरत होते. फिरता-फिरता त्यांचा सामना म्हशीशी झाला. अहो, अमरसिंह थेट नतमस्तक झाले म्हशीसमोर! त्यांनीच मग ‘म्हैस पुराण’ सुरू केले. म्हैस व आझम खान यांचा भावभक्तीचा अपूर्व सोहळा असा रंगवून सांगितला अमरसिंहांनी की सर्वानीच त्यांना दाद दिली.