गुजरातमधील विकास आणि दंगलमुक्त गुजरातचा भाजपकडून केला जाणारा दावा निखालस खोटा असून वस्तुस्थिती निराळीच आहे, असा आरोप माकपने केला आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाची देशात कोणतीही लाट नाही, भाजप कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करण्यास उतावीळ झाला आहे, असे माकपच्या नेत्या वृंदा करात यांनी येथे स्पष्ट केले.
सत्तास्थापनेसाठी भाजप किती उतावीळ झाला आहे हे त्यांच्या कृतीमधूनच स्पष्ट होत आहे. भाजपने केवळ त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली नाही, तर मुझफ्फरनगर दंगलीत ज्यांच्यावर आरोपपत्रे ठेवण्यात आली आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे. या वेळी वृंदा करात यांनी बनावट चकमक प्रकरणातील अमित शहा आणि प्रमोद मुतालिक यांच्या नावाचा उल्लेख केला.
तथाकथित गुजरात मॉडेल हे मजुरांची पिळवणूक, कुपोषण, शाळेतील गळतीचे मोठे प्रमाण, शिक्षण आणि आरोग्यावर अल्प खर्च यावर आधारित आहे. माकपने जी पुस्तिका प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये वस्तुस्थिती स्पष्ट केली असून त्यामधील आकडेवारी जनगणनेतील नोंदीतून घेण्यात आली आहे. गुजरातमधील ९० टक्के लोक दररोज केवळ ७५ रुपये अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करतात, असेही करात म्हणाल्या.