लोकसभेसाठी राज्यातील काँग्रेस उमेदवारांची बहुतांशी नावे निश्चित करण्यात आली असून, विद्यमान १७ पैकी १२ खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना रिंगणात उतरविण्याची योजना असली तरी त्यांच्या उमेदवारीचे राजकीय परिणाम पक्षाला भोगावे लागतील का, हा प्रश्न उपस्थित झाल्याने अशोकरावांच्या उमेदवारीचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी राज्यातील उमेदवारांच्या यादीबाबत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या २६ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांबाबत आढावा घेण्यात आला. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. ‘आदर्श’ घोटाळ्यातील त्यांच्या सहभागामुळे त्याचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यांना उमेदवारी दिल्यास विरोधकांना प्रचाराकरिता संधी मिळेल. यामुळेच अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय हा केंद्रीय निवडणूक समितीकडून घेतला जाईल.
गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, संजय निरुपम आणि एकनाथ गायकवाड या मुंबईतील पाचही विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल. भिवंडीचे खासदार सुरेश टावरे यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. टावरे यांच्याबाबत मोठय़ा प्रमाणावर तक्रारी आहेत. राष्ट्रकूल घोटाळ्यात अटक झाल्यावर सुरेश कलमाडी यांना अटक झाली होती. त्यांना पक्षाने निलंबित केले असले तरी कलमाडी यांनी आपली पत्नी मीरा यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. सोमवारी रात्री सोनिया गांधी यांनी पक्षाच्या खासदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला कलमाडी उपस्थित होते. पुण्यात मोहन जोशी, विनायक निम्हण व विश्वजित कदम यांची नावे चर्चेत आहेत. अमरिश पटेल (धुळे), राजेंद्र गावित (पालघर), संजय देवतळे (चंद्रपूर) यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

सर्वच विद्यमानांना संधी नाही
विद्यमान १७ खासदारांपैकी सर्वांनाच पुन्हा संधी मिळणार नाही. सुरेश कलमाडी, जयंतराव आवळे, मारोतराव कोवासे, दत्ता मेघे या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. यापैक आवळे आणि मेघे यांनी स्वत:च न लढण्याचे जाहीर केले आहे. अशोक चव्हाण यांना संधी दिल्यास विद्यमान खासदार भास्करराव खतगावकर यांना संधी मिळणार नाही.

Story img Loader