वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याबाबत आपल्याशी कुणीही बोललेले नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले. काही चित्रवाणी वाहिन्यांनी मोदींच्या विरोधात दिग्विजय सिंह यांना काँग्रेस उमेदवारी देणार असल्याचे वृत्त दिले होते, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र मोदींच्या विरोधात सक्षम उमेदवार उभा करण्याची काँग्रेसची रणनीती आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदींना आव्हान देण्याची तयारी चालवली आहे.

किरण खेर यांच्यासमोरील पेच कायम
चंडिगढ :  बॉलीवूडमधील अभिनेत्री किरण खेर यांच्यासमोरील आव्हाने थांबण्याची चिन्हे नाहीत. भारतीय जनता पक्षाचे चंडिगढचे माजी खासदार हरमोहन धवन यांचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी खेर गुरुवारी सकाळी टंडन आणि जैन यांच्यासमवेत धवन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि पक्षाला यश मिळावे म्हणून खेर यांच्या प्रचारासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली. मात्र अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही.

तामिळनाडूत भाजपची आघाडी
चेन्नई तामिळनाडूमध्ये सहा पक्षांची आघाडी करण्यात भाजपला यश आले आहे. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी  येथे आघाडीचे जागावाटप जाहीर केले. अभिनेते विजयकांत यांचा डीएमडीके, वायको यांचा एमडीएमके तसेच पीएमके शिवाय आयजेके आणि केएमडीके या पक्षांचा या आघाडीमध्ये समावेश आहे. जागावाटपात राज्यामधील ३९ पैकी सर्वाधिक १४ जागा डीएमडीके लढवणार आहे. तर भाजप आणि पीएमकेकडे प्रत्येकी आठ जागा आल्या  आहेत.

“अण्णा हजारे जर आमच्या सोबत असते तर आमचे उद्दिष्ट सहज साध्य झाले असते. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला शंभर जागा मिळतील. निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि भाजपवगळता जनलोकपाल विधेयक आणण्याचे आश्वासन जो पक्ष देईल त्यांना आप पाठिंबा देईल.”
संजय सिंह, आम आदमी पक्षाचे नेते

“ईशान्य भारतीय जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यात काँग्रेसप्रणीत संपुआ सरकार साफ अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनमानसातील त्यांची नेमकी प्रतिमा काय आहे, हे दाखविण्याची वेळ आली आहे. म्हणून या भागातील १० राजकीय पक्षांनी एकत्र येत काँग्रेसविरोधात ‘ईशान्य आघाडी’ स्थापन केली आहे.” 
पी. ए. संगमा, लोकसभेचे माजी सभापती

Story img Loader