मतदानोत्तर चाचण्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पीछेहाट होणार असे चित्र समोर आल्याने दोन्ही पक्षांमध्ये सध्या धाकधूक आहे. यामुळेच गेले दोन दिवस दोन्ही पक्षांच्या कार्यालयांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
राष्ट्रवादीला यंदा चांगल्या यशाची अपेक्षा होती. प्रथमच दोन आकडी संख्याबळ गाठले जाईल, असा विश्वास नेत्यांना होता. पण मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाल्यापासून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये साहजिकच अस्वस्थता पसरली. त्यातच शनिवारी शरद पवार यांनी आढावा घेतला असता बहुतेक सर्वच उमदेवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. पण गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या मंत्रालयासमोरील मुख्यालयात काहीसे निराशाजनक चित्र आहे. जनमत चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरतील, अशीच समजूत एका नेत्याकडून अन्य पदाधिकाऱ्यांची काढली जात होती.
मात्र निकालाबाबत राष्ट्रवादीच्या कार्यालयात फारसे उत्साहवर्धक वातावरण नसून, पक्षाच्या मुख्यालयातील गर्दीही ओसरली होती.  काँग्रेस कार्यालयातही चित्र वेगळे नाही. गांधी भवन येथे तर आज दिवशभर शुकशुकाट होता. दादरच्या टिळक भवन कार्यालयात काही ठराविक पदाधिकारी उपस्थित होते. पण पक्षाचा पराभव होणार याची कुणकुण लागल्याने पक्षाच्या मुख्यालयात निराशाचेच वातावरण होते.