द्रमुकप्रणीत लोकशाही पुरोगामी आघाडीत (डीपीए) राष्ट्रीय पातळीवरील कोणताही राजकीय पक्ष नसला तरी त्याचा विपरीत परिणाम आघाडीवर होणार नाही. सध्या आघाडीत असलेल्या स्थानिक पक्षांच्या मदतीने निवडणुकांना सामोरे जाण्यास द्रमुक सक्षम आहे, असे पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी म्हटले आहे.
द्रमुकने लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला त्या वेळी ते बोलत होते. श्रीलंकेतील तामिळींच्या प्रश्नावरून द्रमुकने गेल्या मार्च महिन्यांत काँग्रेसशी असलेली आघाडी तोडली होती. दोन्ही पक्षातील संबंध पुन्हा सुधारावे यासाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र करुणानिधी यांनी त्यास नकार दिला.
सध्याच्या स्थितीत डीपीएमध्ये आणखी काही पक्ष सहभागी होतील, असे वाटत नसल्याचे करुणानिधी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यापैकी कोणालाही झुकते माप देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल़े