नारायण राणे यांना विरोध केल्याशिवाय भविष्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्य़ांमध्ये आपण तग धरू शकणार नाही, हे ओळखूनच राणे यांना विरोध करण्याचे राष्ट्रवादीचे धोरणच राहिले. या पाश्र्वभूमीवर राणे
रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात निलेश राणे यांच्या प्रचारात राष्ट्रवादीचे नेते सहभागी होत नाहीत, अशी तक्रार दोन आठवडय़ांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समिती बैठकीत नारायण राणे यांनी केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही बाब शरद पवार यांच्या कानावर घातली होती. गेले दोन आठवडे राष्ट्रवादीच्या असहकाराचीच चर्चा सुरू राहिली. आता मतदानाला चार दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीने कारवाईचे पाऊल उचलले. तोपर्यंत राणे यांना फटका बसेल अशी व्यवस्था राष्ट्रवादीने करून ठेवली होती. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यापासून कोकणातील राष्ट्रवादीची सारी नेतेमंडळी राणे यांच्या विरोधात आहेत. राणे यांच्या विरोधावरच या नेत्यांचे राजकारण सुरू असल्याने या नेत्यांची कितपत मदत होईल याबाबत राणे साशंकच आहेत.
राणे शिवसेनेत असताना गुरुनाथ कुळकर्णी यांनी आक्रमकपणे राष्ट्रवादीच्या विस्तारावर भर देत राणे यांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली. कणकवलीतील राणे यांचा बंगला जाळण्यामागे राष्ट्रवादीच्याच मंडळींचा हात होता. आज राणे यांच्यासोबत असलेल्या संदेश पारकर यांनीही तेव्हा राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. नारायण राणे काँग्रेसवासी झाल्यावरही राणे आणि राष्ट्रवादी यांच्यात हिंसक संघर्ष सुरू राहिला. मालवणमधील राणे यांची पोटनिवडणूक असो वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राणे आणि राष्ट्रवादी यांच्यात कायमच संघर्ष होत राहिला. राणे यांनी तेव्हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बरीच टीका केली होती. मग आर. आर. पाटील यांनीही राणे यांच्यावर दहशत निर्माण करीत असल्याचे थेट आरोप केला होता. कोकणातील नगरपालिका निवडणुकांमध्येही राणे आणि राष्ट्रवादी पुन्हा भिडले होते. राणे आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. त्यातून परस्परांच्या कार्यालयांवर हल्ले करण्यापर्यंत उभयतांची मजल गेली होती. आता शरद पवार यांनी निलेश राणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले असले तरी राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील मदतीबाबत साशंकताच आहे. राणे यांना आज आमच्या मदतीची गरज आहे. पण उद्या हेच राणे आमच्या मागे लागतील, ही जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेल्या बाळ भिसे यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.
ठाण्यासह कोकणात विधानसभेच्या जास्तीत जास्त जागाजिंकण्याचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. त्यातूनच लोकसभेची रायगडची जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतली. राणे यांना शह दिल्याशिवाय हे शक्य नाही. यामुळेच राणे विरोधावरच राष्ट्रवादीचे भविष्यातील राजकारण अवलंबून आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा