गेल्या पाच वर्षांत घोटाळे व भ्रष्टाचारांचे आरोप सुरू होते, त्यामुळे मतदार संभ्रमात होते. त्या वेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तोंड उघडले असते, वेळावेळी खंडन केले असते, तर लोकसभा निवडणुकीच्या निकालात ५० टक्के फरक पडला असता. मनमोहन सिंग यांचा संयम पृथ्वीवरील सर्वात मोठा संयम असल्याची खोचक टीका ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी केली. लोकसभेच्या प्रचारासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सभा घेण्याची इच्छाही प्रदर्शित केली नाही याबद्दलही मंत्री पाटील यांनी टीका केली. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केली. मतदार हुशार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या विधानसभा मतदारसंघात अवघे चार हजाराचे मताधिक्य होते. परंतु विधानसभा निवडणुकीत मला फारसा प्रचार न करताही ५६ हजारांच्या मताधिक्याने मतदारांनी निवडून दिले. कुणाला कुठे निवडून द्यायचे हे मतदारांना चांगले समजते. त्यामुळे राज्यातील मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा येत्या विधानसभेत चित्र वेगळे दिसेल. यूपीए सरकारच्या पराभवाची कारणमीमांसा करताना पाटील म्हणाले, सध्याचे युग जाहिरातीचे आहे. अवघ्या सहा महिन्यांत अहमदाबादपासून दिल्लीपर्यंत मोदींचा झपाटय़ाने प्रवास घडतो, हे यातून सिद्ध झाले. आम्ही घराघरांत प्रचार करीत होतो, तेव्हा मोदी प्रसारमाध्यमातून प्रचार करीत होते. मतपरिवर्तन करण्याची ताकद प्रसारमाध्यमांमध्ये आहे. प्रसारमाध्यमांचे महत्त्व दुर्लक्षित करून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा