निवडणूक प्रचार संपल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदार संघाबाहेर पडण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री विजयकुमार गावीत यांची  पंचाईत झाली आहे.
गुरुवारी  १९ मतदार संघात निवडणूक होत आहे. त्यापैकी ठाण्यात पालकमंत्री गणेश नाईक यांचे चिरंजीव संजीव, कल्याणमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत, रावेरमध्ये विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा आणि नंदूरबारमधून माजी मंत्री विजयकुमार गावीत यांच्या कन्या हिना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपल्या सग्यासोयऱ्याच्या विजयासाठी या नेत्यांनी गेले काही दिवस दिवसरात्र मेहनत घेतली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या एका आदेशामुळे ऐन लढाईच्या वेळी म्हणजेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी या नेत्यांना आपल्याच मतदारसंघात कोंडून घ्यावे लागणार आहे.
मतदानाच्या दिवशी मतदार संघात फिरताना खासदार आणि आमदारांकडून मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याच्या काही तक्रारी आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. कर्नाटकमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अशाचप्रकारे खासदार, आमदारांकडून मतदानादिवशी खासदार, आमदारांकडून मतदारांवर प्रभाव पाडण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या पाश्र्वभूमीवर उद्या मतदानादिवशी आपला मूळ मतदारसंघ सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या मंडळींना त्यांच्या मतदार संघात मात्र फिरण्याची मुभा देण्यात आली असली तरी कोणत्याही परिस्थितीत ते जेथून निवडून आले आहेत, त्या मतदार संघाबाहेर जाता येणार नाही. तसा कोणी प्रयत्न केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयोगाने दिला आहे.
या निर्णयामुळे गणेश नाईक यांना बेलापूरच्या बाहेर पडता येणार नाही. विशेष म्हणजे आपल्या मुलाच्या पहिल्याच निवडणुकीसाठी गेले पंधरा दिवस कल्याण-डोंबिवलीत तळ ठोकून बसलेल्या एकनाथ शिंदे यांना कोपरी-पाचपखाडीच्या बाहेर पडता येणार नसल्याने सेनेला धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगरमध्ये तर गावीत यांना नंदूरबारबाहेर जाता येणार नाही. आयोगाचा हा आदेश अन्यायकारक असल्याचे सांगत शिंदे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे धाव घेतली  होती. मात्र तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ec denies mp mla to go outside their constituencies