प्रचारादरम्यान द्वेषमूलक भाषणे केल्याचा आरोप असलेले उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी याप्रकरणी माफी मागण्यास सपशेल नकार दिला, तसेच अमित शहा यांच्याबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याची भावनाही व्यक्त केली.
उत्तर प्रदेशात प्रचार करण्यास आझम खान यांना निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. त्यांच्या बरोबरीनेच भाजपचे अमित शहा यांनाही आयोगाने सुरुवातीस अशीच मनाई केली होती. मात्र, गुरुवारी रात्री आयोगाने शहा यांना दिलासा देत ती बंदी उठवली. आयोगाच्या या निर्णयावर खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
आपण माफी तर मागणार नाहीच, पण आयोग हे न्यायव्यवस्थेपुढे दुय्यम असतात हेही दाखवून देऊ. मी काही गुन्हा केलेला नाही आणि एखादा आयोग आपल्या अधिकारांचा दडपशाहीने वापर करीत असेल तर ते संतापजनक आहे, अशी भावना खान यांनी व्यक्त केली.