केंद्रीय अन्वेषण विभागच नव्हे, तर निवडणूक आयोगही केंद्र सरकारच्याच प्रभावाखाली काम करीत असल्याचा गंभीर आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला आहे. तसेच आपल्यावर घालण्यात आलेल्या बंदीविरोधात आपण न्यायालयात दाद मागितल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकीही खान यांनी दिली.
आझम खान आणि अमित शहा यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या द्वेषमूलक भाषणांची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना सार्वजनिक सभा घेण्यास मनाई करणारा आदेश ११ एप्रिल रोजी जारी केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या खान यांनी आयोगावर आगपाखड केली.
आझम खान यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा
शामली जिल्ह्य़ात द्वेषमूलक भाषण केल्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी जलालाबाद येथे झालेल्या निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान, नरेंद्र मोदी यांचे हात निरपराध नागरिकांच्या रक्ताने माखलेले आहेत व त्यांना देशाचे नेतृत्व मिळता कामा नये, असे वक्तव्य आझम खान यांनी केले होते.
ज्या काँग्रेसला सांप्रदायिक शक्ती रोखण्यासाठी समाजवादी पक्षाने १० वर्षे पाठिंबा दिला त्या पक्षावरच काँग्रेस उलटली आहे. निवडणूक आयोग काँग्रेसचा ‘गुलाम’ झाला आहे. माझ्यावर घालण्यात आलेली सभाबंदी हा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे. समाजवादी पक्षाला त्रास देणे हा यामागील स्पष्ट हेतू आहे.     – आझम खान