राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाबाबत निवडणूक आयोगाने पुढील आठवडय़ात राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला बैठकीला बोलावले आहे. लोकसभा निकालानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये, अशी नोटीस या पक्षांना निवडणूक आयोगाने बजावली होती. राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा राखण्यासाठी ज्या अटी आहेत, त्या पूर्ण केल्या नसल्याने आयोगाने ही नोटीस बजावल्याचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले. १९ ऑगस्टला निवडणूक आयोग त्यांचे म्हणणे ऐकून घेईल.
राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा राखण्यासाठी लोकसभेच्या एकूण जागांच्या दोन टक्के म्हणजे ११ जागा तीन राज्यांतून जिंकणे गरजेचे आहे. याखेरीज लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकूण वैध मतांच्या किमान सहा टक्के मते मिळणे गरजेचे आहे. तसेच चार लोकसभेच्या जागा जिंकणे आवश्यक आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपला ४.१ टक्के मते मिळाली, मात्र त्यांना एकही जागा मिळाली नाही. भाजप व काँग्रेसनंतर त्यांच्या मतांची टक्केवारी सर्वाधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १.६ टक्के मते आणि सहा जागा मिळाल्या, तर भाकपला .८ टक्के मते व केवळ एक जागा मिळाली. देशात भाजप, काँग्रेस आणि माकप यांच्याखेरीज बसप, राष्ट्रवादी काँग्रेस व भाकप यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा