ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात पक्षाची हवा निर्माण होत नसल्याची दखल घेत खुद्द ‘मातोश्री’वरून खास नेत्यांची कुमक ठाण्याकडे रवाना होताच खडबडून जागे झालेले शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी, वागळे आणि ओवळा-माजीवडय़ातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली असून ‘मताधिक्य द्या.. नाही तर तुमची खैर नाही’, अशा शब्दांत इशारेबाजी केल्याने शिवसेनेतील मरगळीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. प्रचार साहित्य असो अथवा आर्थिक रसद. सगळ्याच आघाडय़ांवर कोंडी होऊ लागल्याने शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. या पाश्र्वभूमीवर चार दिवसांपूर्वी झालेल्या भव्य अशा मोटारसायकल रॅलीमध्ये शिवसैनिकांना प्रथमच ‘एम व्हिटॅमिन’चे टॉनिक देऊन िशदे यांनी उपकृत केल्याचीही चर्चा आहे.
कल्याणची मोहीम काहीशी अवघड बनल्याने गेल्या महिनाभरापासून िशदे आपल्या चिंरजीवाच्या प्रचारासाठी तेथे तळ ठोकून आहेत. त्यांना कुर्निसात करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच नगरसेवकांचे जथ्थे ठाण्यातून दररोज कल्याणच्या दिशेने रवाना होऊ लागल्याने ठाण्यातील पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराची बाजू लंगडी पडल्याचे चित्र होते. यासंबंधीच्या तक्रारी सातत्याने पोहचू लागताच स्वत: रश्मी ठाकरे यांनी ठाणे, नवी मुंबईचे दौरे सुरू केले. आदित्य ठाकरे यांना ‘रोड शो’च्या निमित्ताने वारंवार ठाण्यात पाठविले जाऊ लागले. त्यानंतरही वातावरणनिर्मिती करण्यात फारसे यश येत नसल्याचे लक्षात येताच ‘मातोश्री’वरून पक्षाचे सचिव विनायक राऊत यांना ठाण्याच्या मोहिमेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ओढा कल्याणच्या दिशेने लागल्याने उद्विग्न झालेल्या िशदे यांनी गेल्या चार दिवसांपासून ठाण्यात तळ ठोकला असून कार्यकर्त्यांना लागणाऱ्या ‘रसदे’चे पाटही खुले करून दिल्याचे चित्र आहे. ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी हे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. मागील लोकसभा निवडणुकीत ओवळा-माजीवडा मतदारसंघात शिवसेनेला दहा हजार मतांच्या पिछाडीवर राहावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत कोपरीतून िशदे सुमारे २५ हजार मतांनी विजयी झाले होते. काहीही झाले तरी हे मताधिक्य टिकायलाच हवे असा दम िशदे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना भरला असून कल्याणमध्ये फिरकलात तर याद राखा, असा इशाराही त्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिला. ‘मताधिक्य मिळाले नाही ..तर तुमची खैर नाही’, असा दम िशदे यांनी भरल्यामुळे दोन दिवसांपासून शिवसेनेतील शाखा पुन्हा कार्यरत झाल्या असून टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमाचे दरवाजे रात्री उशिरापर्यंत खुले राहू लागले आहेत. गेल्या महिनाभरापासून पक्षात निर्माण झालेल्या मरगळीवर अखेरच्या दिवसातील ही दमबाजी उतारा ठरू शकेल का, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
अखेर शिंदे ठाण्यात परतले..
ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात पक्षाची हवा निर्माण होत नसल्याची दखल घेत खुद्द ‘मातोश्री’वरून खास नेत्यांची कुमक ठाण्याकडे रवाना होताच खडबडून जागे झालेले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-04-2014 at 04:12 IST
TOPICSएकनाथ शिंदेEknath ShindeलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde returned to thane