महाराष्ट्र भाजपचे कर्तेधर्ते म्हणून ओळखले गेलेले दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन उत्तर-मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभेसाठी आपले नशिब आजमावत आहेत. मतदारसंघात पूनम महाजन यांचा जोरदार प्रचार सुरू आहे, अर्थात सर्वच उमेदवार प्रचार करतात. परंतु, काँग्रेसकडून विद्यमान खासदार प्रिया दत्त उमेदवार असल्यामुळे मुंबईतील या मतदारसंघात यावेळी दोन ‘राजकीय कन्या’ एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.
‘उमेदवारासोबत प्रचाराचा एक दिवस’ असा मानस असल्याने आणि त्यात मुंबईच्या उत्तर-मध्य मतदार संघातील उमेदवारीवरून प्रिया दत्त यांच्या विरोधात प्रबळ उमेदवारासाठी भाजपकडून नाना पाटेकर, प्रीती झिंटा, मोहित कंबोज, आशिष शेलार अशा अनेक नावांची चर्चा रंगली होती. अखेर पूनम महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे भाजपच्या गोटात निवडणूक होईपर्यंत या मतदार संघाबाबत यावेळी शक्य-अशक्यतांचे दडपण राहणार आहे. यापार्श्वभूमीवर पूनम महाजन यांच्या प्रचारासोबतचा एक दिवस..

* जॉगिंग आणि प्रचार..
मतदार संघाची व्याप्ती लक्षात घेऊन पूनम महाजन यांच्या प्रचाराचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंतच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार पूनम महाजन प्रचारात व्यस्त असतात. दिवसभरातील प्रचाराची सुरूवात सकाळी सात वाजता ‘जॉगिंग ट्रॅक’पासून होते. वांद्रे पश्चिम येथील ‘जॉगिंग ट्रॅक’वर अचूक सातच्या ठोक्याला पूनम महाजन हजर झाल्या. अपेक्षेप्रमाणे मोजक्या कार्यकर्त्यांचा घोळका (कदाचित सकाळची वेळ असल्यामुळे निवडक कार्यकर्त्यांनी हजर रहावे असे सांगण्यातही आले असावे) त्यांची वाट पाहत होता… त्या दाखल होताच स्वागत करण्यात आले.. काही मिनिटभर कार्यकर्त्यांशी संवाद साधून पूनम महाजन यांनी जॉगिंगसाठी आलेल्या पाच-सहा जणांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या गटाला गाठले आणि त्यांच्याशी मुक्त-संवाद साधला. यात अगदी स्वत:ची ओळख करून देण्यापासून ते खासदारकीच्या माध्यमातून जनतेसाठी काम करण्यापर्यंतची माहिती पूनम महाजन यांनी दिली. जॉगिंगला आलेली मंडळीही पूनम महाजन यांच्याशी मुक्तपणे संवाद साधत होती. त्यातील एकाने मोदीच पंतप्रधान व्हावेत, अशी आमचीही इच्छा असल्याचे म्हटले आणि पूनम महाजन यांनी आभार व्यक्त करत फक्त तुमचा आशीर्वाद सोबत असू द्या, असे म्हणत त्यांचा निरोप घेतला

* तळहाती ‘कमळ’ मेहंदी आणि उत्साही प्रचार..
जॉगिंग ट्रॅकवरील फेरफटक्यानंतर नऊ-साडेनऊच्या सुमारास पूनम महाजन नियोजित वेळापत्रकानुसार पदयात्रा प्रचार करतात..
‘पूनम ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’, ‘हात’ करेल घात..करू नका घाई.. आता फक्त पूनम ताई.. अशी घोषणाबाजी पूनम महाजन यांच्या शेजारी उपस्थित असलेली महिला कार्यकर्ती करते आणि इतर कार्यकर्त्यांचाही घोषणाबाजीचा नाद घुमू लागतो आणि पूनम महाजन यांचा कटआऊट, पक्षाचे झेंडे वगैरे लावून सजविलेल्या उघडय़ा प्रचार वाहनावरून प्रचाराला सुरूवात होते… विशेष म्हणजे, प्रचारात महिला कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड असतो, कदाचित महिला उमेदवार असल्यामुळे असेलही असे जाणवते… काही महिलांच्या तळहातावर चक्क पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाची मेहंदी देखील काढण्यात आली होती. यावरून या मतदार संघातील महिला कार्यकर्त्यांची उत्साही वृत्ती लक्षात येते… रस्त्याच्या एका कडेने महाजन यांचा प्रचाररथ पुढे सरकत असतो.. रथावरून पूनम महाजन हातेवारे, नमस्कार करून रखरखत्या उन्हातही प्रफुल्लित चेहऱयाने सर्वांना प्रतिसाद देत असतात.. कोणी एक उत्साही कार्यकर्ती पुढे येते आणि पाण्याची बाटली पूनम ताईंना देते.. घोटभर पाणी घेत महाजन पाण्याची बाटली परत देतात… मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यावर प्रचार रथ घेऊन फिरणे म्हणजे वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या.. यासाठी काही शिट्याधारी कार्यकर्ते वाहतूक सुरळीत राखण्याच्या उद्देशाने सक्रीय होतात.. त्यात प्रत्येक सिग्नलला उपस्थित वाहतूक पोलीसही आपापल्यापरीने वाहतूक सुरळीत राखण्याचा प्रयत्न करतात… जेथे प्रचार रथ जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी मग पूनम महाजन प्रचार वाहनातून खाली उतरतात आणि फेरफटक्याला सुरूवात करतात…पुढे लहान चौका-चौकात स्थानिक महिला नटून-थटून ओवाळणीचे ताट घेऊन महाजन यांची वाट पाहत असतात… ओवाळणी होते, फटाक्यांची आतषबाजी होते आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रचारस्वारी पुढे-पुढे सरकत असते… ज्येष्ठ महिलांशी गळाभेट, नमस्कार आणि ‘आजी मतदान नक्की करायचं हं’ असं सांगत पूनम महाजन प्रचारात प्रतिसाद देत असतात.. कुठे चाळींमधील बैठ्या घरांच्या गच्चीवरून महिला डोकावून पाहताना दिसल्या..तर कुठे दुकानदार आपल्या दुकानासमोरील गर्दीला बाजूला सारून आपल्या मतदार संघातील भाजपच्या उमेदवाराला पाहण्यासाठी चलबिचल करताना दिसला…

* प्रचारसभेत स्थानिक समस्यांचा समाचार..
पूनम महाजन आणि कार्यकर्त्यांचा प्रचार ताफा सायंकाळी पाचच्या सुमारास शिवसेनेच्या एका शाखेजवळ येऊन पोहोचला..शाखेसमोरील अरुंद रस्त्यावर जय्यत तयारी करण्यात आली होती..’डीजे’वर ‘नमो’ गाणे सुरू होते…शाखेसमोर शंभर-एक खुर्च्यांची व्यवस्था आणि त्याहून अधिक संख्येने उपस्थित असलेल्या गर्दीसमोर पूनम महाजन यांचे भाषण…
मतदार संघातून फिरताना स्थानिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणलेल्या समस्यांचे विषय भाषणात येतात, समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले जाते. भाषण संपल्यावर शाखेत चहापानाचा कार्यक्रम होतो..त्यात उत्साही कार्यकर्त्यांचा फोटो काढण्यासाठीचा क्लिकक्लिकाट सुरू होतो..पूनम महाजनही आनंदी मनाने सर्वांना प्रतिसाद देतात..त्यानंतर पुन्हा प्रचाराचा गाडा पुढे सरकतो.. मुख्य रस्त्यापर्यंत पदयात्रा केल्यानंतर महाजन पुन्हा आपल्या प्रचार वाहनात चढतात आणि पुन्हा प्रचारासाठी फेरफटक्याला सुरूवात होते.. अंधार पडू लागल्यानंतर वाहनावरील दिवे प्रकाशित होतात.. दगदगीमुळे चेहऱ्यावर थकवा असला तरी कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या माळा लावून घोषणा सुरू केल्यावर सर्वांमध्येच उत्साह संचारतो आणि रात्री नऊच्या सुमारास प्रचाराचा शेवट होतो..पूनम महाजन आपल्या वाहनातून घरी परतात..निघताना कार्यकर्त्यांना ‘जेवून घ्या, काळजी घ्या’ अशी सूचना (खासकरून महिला कार्यकर्त्यांना) केली जाते आणि महाजन यांची कार मार्गस्थ होते..
एकंदर उत्तर-मध्य मुंबई मतदार संघात विद्यमान खासदार प्रिया दत्त यांचा प्रबळ दबदबा असल्यामुळे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या पूनम महाजन यांना लोकसभेचा पेपर तितकाच कठीण जाण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा उत्साही प्रचार, तरुण नेतृत्व, महाजनांचा वारसा आणि मोदींचा प्रभाव यामुळे पूनम महाजन यांचेही पारडे जड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दत्त की महाजन? कोणत्या बाजूला जनतेचा कौल मिळतो हे मे महिन्याच्या १६ तारखेला स्पष्ट होईल..