फुलांचे मशीन!
हजारोंच्या गर्दीतही आपल्याला आपल्या नेत्याने आपल्याला ओळखण्यासाठी कार्यकर्ते काहीही करू शकतात. त्यात उत्तर प्रदेश असेल तर काही विचारायलाच नको. रस्त्यावर हजारोंची गर्दी. चाळिशीच्या वर पारा. खुल्या वाहनात स्वार झालेले नेते घामामुळे अस्वस्थ. त्याच डीजेच्या तालावर नाचता-नाचता वाहनावर फुले उधळण्याच्या नादात आपण नेत्याला फुलं फेकून मारत आहोत याचेही भान कार्यकर्त्यांना राहात नाही. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी असाच अनुभव राहुल गांधी व अखिलेश यादव यांना आला. रस्त्यारस्त्यावर फुलं उधळून स्वागत केले जात होते. राहुल गांधी यांच्या वाहनाच्या उंचीमुळे त्यांच्यापर्यंत फार कमी फुलं पोहोचत होती. भय्याजींना त्रास होतोय म्हणून समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी शक्कल लढवली. वाराणसीच्या दोन चौकांत फुलं उधळण्यासाठी थेट मशीनच लावले. मशीन कसले?  सुपासारखे कसले तरी यंत्र होते. त्यातून फुलं उधळली जात होती. ते पाहून भय्याजी आनंदले. समाजवादी पक्ष बदललाय. लॅपटॉप चालत नसले म्हणून काय झाले? प्रगती तर झाली.

भाजपचे यादी प्रमुख
‘बूथ जीता, यूथ जीता’ ही भाजपची घोषणा यंदाच्या निवडणुकीत भलतीच गाजली. वाराणसीत त्यापुढचे नियोजन करण्यात आले आहे. वाराणसीत बूथनिहाय प्रमुखांसमवेत मतदारयादी प्रमुखदेखील नेमण्यात आले आहे. प्रत्येक यादीप्रमुख हे बूथ प्रमुखांच्या अखत्यारित येतील. मतदानाच्या दिवशी सर्वात जास्त जबाबदारी या यादी प्रमुखांवर. बूथ प्रमुख प्रामुख्याने संघपरिवारातील संघटनेशी संबधित. यादीप्रमुखही त्याच गटाचा. हा यादीप्रमुख यादीतील सर्वाना मतदान करायला नेणार. त्यांना नेण्या-आणण्याची व्यवस्था करणार. यादीनुसार तासा-तासाला किती मतदान झाले, याची लाइव्ह माहिती बूथ प्रमुखांना दिली जाईल. प्रत्येक बूथवर जातीनिहाय मतदारांची यादी भाजपकडे तयार आहे. रात्री उशिरा बूथ प्रमुखांची बैठक होईल. त्यात जातीनिहाय किती मतदान झाले याची माहिती एकत्रित केली जाईल. त्यानंतर ठरेल मोदींच्या मताधिक्याचा आकडा. या आकडय़ावर सत्ता आणि सत्ताबाजार अवलंबून आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या बाहुबलींचे लक्ष वाराणसीच्या या सत्ताबाजारावर केंद्रित झाले आहे.

राहुल गांधींची ‘चाय पे चर्चा’
होय, राहुल गांधी यांनीदेखील वाराणसीत ‘चाय पे चर्चा’ केली. तेही पप्पूच्या चहाच्या दुकानावर! हा पप्पू आहे वाराणसीच्या अस्सी भागातील. पप्पूची चहा वाराणसीत प्रसिद्ध आहे. त्याच्या हातची चहा राहुल गांधी पिणार होते. चहासोबत कार्यकर्त्यांशी चर्चा. सुरक्षा रक्षकांनी पप्पूच्या चहाच्या दुकानाची शुक्रवारी झाडाझडती घेतली होती. ऐन वेळी राहुल गांधींना त्याच्या दुकानावर जाणे टाळावे लागले. पण त्या भागात आल्यावर पप्पूची चहा राहुल गांधी यांनी घेतली. राहुल चहा घेतात म्हटल्यावर उमेदवार अजय राय यांनीदेखील एक ‘कुल्हड’ मागितला. चहा पिऊन राहुल गांधी खूश झालेत. तिथून राहुल गांधींचा ‘रोड शो’ पुढे सरकला. त्याच भागात महाराष्ट्राचे मोहन प्रकाश यांचे घर होते. तिथे मोहन प्रकाश यांनी राहुल गांधींचे जोरदार स्वागत केले. त्यांना अंगवस्त्रम् भेट दिले. अजय राय यांनी मोहन प्रकाश यांना चरणस्पर्श केला. आणि राहुल गांधींचा काफिला पुढे सरकला. गेल्या दोन महिन्यांपासून एका चहावाल्याने साऱ्या काँग्रेसच्या नाकात दम केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही चहावाला होताच. तोही पप्पू!