लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी या वेळी मोठय़ा प्रमाणावर म्हणजे सुमारे सात लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीसाठी नेमणुका करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांचे मूळ वेतन व ग्रेड वेतनाच्या आधारावर १५ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे, तर काही विशिष्ट कामासाठी नेमणुका करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन व आहार भत्त्यातही घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत एक लाख मनुष्यबळ निवडणूक कामात गुंतले आहे. त्यात सुमारे २५ हजार अधिकाऱ्यांचा व ७५ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर पडणारा ताण, कामाची व्याप्ती व कामाचे दिवस लक्षात घेऊन राज्य, जिल्हा व तहसील स्तरावरील राजपत्रित अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार लागू असलेले मूळ वेतन अधिक ग्रेड वेतन एवढी रक्कम मानधन म्हणून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर मतदान, मतमोजणी वा इतर प्रासंगिक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या निवडणूक भत्त्यातही चांगली वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही याच दराने मानधन व निवडणूक भत्ता मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा