लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मोदी यांची सोशल मीडीयावरील हवा ओसरत असल्याचे परखड मतप्रदर्शन केले. सोशल मीडीया हे प्रभावी माध्यम असले तरी त्याच्या आहारी जाऊ नका, असा सल्लाही ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा यशवंत नाटय़मंदिरात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे यांनी आपल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना सोशल मीडीयाबाबत आपली भूमिका मांडली. मोदी यांनी अतिशय प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करून वातावरण निर्मिती केली. पण दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडीयावर ‘मोदी-मोदी’ चा जप करणारे आज त्यांच्या विरोधी बोलत आहेत. त्यांची हवा ओसरत चालली असल्याचे ठाकरे यांनी सोशल मीडीयावरील मोदी यांच्याबाबतचा एक किस्सा सांगून स्पष्ट केले.
मी गेली २५ वर्षे राजकारणात असून त्यावेळी सोशल मीडीया नव्हता. हे प्रभावी माध्यम असले तरी त्याच्या आहारी जाण्याचे कारण नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे यांचे चिरंजीव मनविसेचे काम सुरू करणार, यासंबंधीच्या बातम्यांचा उल्लेख करून अमितला ‘लाँच’ करायला, तो काही रॉकेट आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. योग्य वेळी त्याबाबतचा निर्णय होईल, असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader