तीन लाख किमीपेक्षा अधिक प्रवास करून दोन हजारांहून अधिक जाहीर सभा व प्रचारफेऱ्या घेऊन देशभर झंझावात निर्माण करणारे नरेंद्र मोदी यांची पावले आता पंतप्रधानपदाच्या खुर्चीकडे वळणार आहेत. देशभर निर्माण झालेली मोदीलाट आणि काँग्रेसविरोधी वातावरण यांच्या जोरावर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) २७२ पेक्षा अधिक जागा जिंकून केंद्रात सत्ता स्थापन करेल, असा सूर सोमवारी सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला. तर काँग्रेसप्रणीत यूपीएला जबर फटका बसेल, असे भाकीतही या चाचण्यांनी वर्तवले आहे.
आजवरच्या सर्वाधिक नऊ टप्प्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची सोमवारी सायंकाळी सांगता झाली. त्यापाठोपाठ विविध वृत्तवाहिन्या व निवडणूक विश्लेषक संस्थांनी आपले मतदानोत्तर अंदाज जाहीर केले. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसप्रणीत यूपीए आघाडीला घरचा रस्ता दाखवत मतदार यंदा भाजपप्रणीत एनडीएच्या हाती सत्तेच्या चाव्या देतील, असा अंदाज या चाचण्यांतून व्यक्त झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार या मोठय़ा राज्यांतून जास्त जागा जिंकून एनडीए २७२चा आकडा सहज पार करेल, असे भाकीत या चाचण्यांनी वर्तवले आहे. काही चाचण्यांनी केवळ भाजपलाच २३०हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज मांडला आहे. दुसरीकडे सर्वच चाचण्यांनी काँग्रेसला १०० ते १४० या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर तिसऱ्या आघाडीलाही याच दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये काँग्रेसचा पुरता सफाया होणार असून येथील सातपैकी पाच जागी भाजप व दोन जागी आपचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाला भरघोस यश मिळण्याची शक्यता नसली तरी पाचपर्यंत जागा जिंकून या पक्षाचा लोकसभेत प्रवेश होईल, असा अंदाज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा