चारित्र्यावर चिखलफेक केल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अडसूळांसह १३ शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या चित्रीकरणादरम्यान रविवारी हा प्रकार घडला.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या ‘वारी लोकसभेची’ या कार्यक्रमाचे चित्रीकरण रविवारी अमरावतीत झाले. वृत्तवाहिनीच्या बसमध्ये आनंदराव अडसूळ, नवनीत राणा यांच्यासह पक्षाचे कार्यकर्तेही बसले होते. यावेळी प्रश्नोत्तरांदरम्यान अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. गोंधळ उडाल्यानंतर नवनीत राणा रडतच बसमधून उतरल्या आणि त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात जाऊन अडसुळांसह १३ शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात विनयभंग, जिवे मारण्याची धमकी आणि अ‍ॅट्रोसिटीज कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
नवनीत राणा या पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले. त्याचवेळी नवनीत राणा यांना मुंबईहून दूरध्वनीवरून धमक्या देण्यात आल्याची चर्चा पसरली. आमदार रवी राणा पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर नवनीत राणा यांनी हुंदके देतच फिर्याद नोंदवली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून अडसूळ हे आपले चारित्र्यहनन करीत असून दलिताची मुलगी सुंदर असूच शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सुंदर असण्यासोबतच चारित्र्यवान असावे लागते, अशा शब्दांमध्ये आपल्यावर त्यांनी चिखलफेक केली, असा आरोप नवनीत यांनी पोलीस ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. त्यांनी संपूर्ण स्त्रीजातीचा अपमान केला असून जनता त्यांना धडा शिकवेल, असे नवनीत यांचे पती रवी राणा यांनी सांगितले.
नवनीत राणा यांनी आपल्याविरोधात केलेले आरोप तथ्यहीन असून वृत्तवाहिनीच्या चित्रिकरणादरम्यान गोंधळ घालण्याचा त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. सुरुवातीपासूनच त्यांची देहबोली मुद्दाम गोंधळ घडवून आणण्याची होती. चिथावणीखोर भाषा वापरून वाद त्यांनीच निर्माण केला. आपण त्यांच्या चारित्र्याविषयी कोणतेही अनुद्गार काढलेले नाहीत. संबंधित वृत्तवाहिनीकडून ‘फुटेज’ ताब्यात घेतले जावे, या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जावा.
आनंदराव अडसूळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir filed against mp anandrao adsul
Show comments