भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून तीन सदस्यांची वर्णी लावण्यात आली असली तरी केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या गटातील नेत्यांना मात्र डावलण्यात आले आहे.
विदर्भातील नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव नव्या कार्यकारिणीत राहील, अशी अपेक्षा होती. गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, खासदार पूनम महाजन यांची कार्यकारिणीत वर्णी लागली. कार्यकारिणीत मुंबई आणि मराठवाडय़ाला स्थान देण्यात आले असले तरी विदर्भाला मात्र डावलण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात परत न येण्याचे घोषित केले. त्यामुळे प्रदेशाचे नेतृत्व कुणाकडे द्यावे, हे अद्याप निश्चित झाले नाही. विदर्भात गडकरी गटाचे वर्चस्व असल्यामुळे आणि केंद्रात त्यांच्या शब्दाला मानही असल्यामुळे विदर्भातील एका तरी नावाचा विचार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. अमित शहा यांची  अध्यक्षपदी निवड झाल्यावर ते नागपुरात आले असता देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी थांबले होते.
नाराजी नाही -आमदार मुनगंटीवार
या संदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, पक्षाने केंद्रीय कार्यकारिणीत जबाबदारी दिली नसली तरी नाराज नाही. यापुढे पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारून पक्ष संघटन मजबुतीसाठी काम करणार आहे.
पक्षातील नव्या पदाबाबत येडियुरप्पा समाधानी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भाजपचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्याबद्दल येडियुरप्पा यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपली केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी जनतेची इच्छा होती, असेही येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.आपल्याला केंद्रीय मंत्री करावे, अशी जनतेची इच्छा होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवावी अशी आपली इच्छा होती, असे येडियुरप्पा यांनी वार्ताहरांना सांगितले.केंद्रीय मंत्री अनंतकुमार आणि  अन्य नेत्यांनी आपल्यासाठी जोरदार प्रयत्न केले, असेही ते म्हणाले.