लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आता त्यामध्ये गांधी कुटुंबीयांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची भर पडली आहे. लोकसभेच्या निवडणुका म्हणजे विचारसरणीतील संघर्ष आहे, कौटुंबिक चहापानाचा कार्यक्रम नाही, अशा शब्दांत प्रियंका गांधी-वढेरा यांनी आपले चुलत बंधू वरुण गांधी यांना फटकारले आहे. तर प्रियंकाने सभ्यतेची लक्ष्मणरेषा ओलांडली असल्याचा हल्ला वरुण गांधी यांनी चढविला आहे.
लोकसभा निवडणूक हा विचारसरणीतील संघर्ष असतानाही वरुण यांचे कृत्य म्हणजे कुटुंबाशी केलेली प्रतारणा असल्याचे मत प्रियंका यांनी व्यक्त केले आहे. प्रियंका गांधी यांनी सभ्यतेची लक्ष्मणरेषा ओलांडली आहे, कोणालातरी कमी लेखून कोणा एखाद्याची महती वाढविता येत नाही, असा हल्ला वरुण गांधी यांनी चढविला आहे.
अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तर त्याच्या शेजारीच असलेल्या सुलतानपूर मतदारसंघातून भाजपचे वरुण गांधी निवडणूक लढवीत आहेत. हे दोन्ही मतदारसंघ नेहरू-गांधी घराण्याचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी प्रियंका अमेठीत आल्या असताना त्यांनी वरुण यांच्यावर टीका केली. तर सुलतानपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर वरुण गांधी यांनी प्रियंका यांच्यावर हल्ला चढविला.
वरुण गांधी यांना योग्य मार्ग दाखविण्याची गरज आहे, आपला मुलगाही वरुणप्रमाणे भरकटला तर त्यालाही आपण माफ करणार नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. वरुणबाबत आपण जे वक्तव्य केले त्याची व्हिडीओ चित्रफीत फुटली असली तरी त्यामुळे आपण अस्वस्थ झालो नाही, आपण आपली मते व्यक्त केली आहेत, असेही प्रियंका म्हणाल्या.
गेल्या दशकात आपण, आपले कुटुंबीय अथवा कोणत्याही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याविरुद्ध बोलताना सभ्यतेची मर्यादा ओलांडलेली नाही. आणि माझ्यासाठी माझ्या मार्गापेक्षा देशाचा मार्ग अधिक महत्त्वाचा आहे, असेही वरुण म्हणाले. देशाच्या उभारणीत मी काही योगदान दिले तर आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान वरुण यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अमिता सिंह यांनीही वरूण यांच्यावर शरसंधान केले. आपल्या वडिलांची (संजय गांधी यांची) कर्मभूमी सुलतानपूर असल्याचे वरूण सांगतात पण, त्यांची कर्मभूमी अमेठी आहे याचेही त्यांना भान नाही, असे अमिता म्हणाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा