महाराष्ट्राच्या राजकारणात गेली ३६ वर्षे सक्रिय असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे एक रांगडे व्यक्तिमत्व. खेडय़ापाडय़ातील जनतेतही सहजपणे मिसळून जाणारे, व मुरब्बी राजकारणी. त्यांनी राजकीय परिस्थिती आणि विविध मुद्दय़ांवर केलेले हे विवेचन..
देशात आणि महाराष्ट्रात भाजपला निवडणुकीत किती यश मिळेल? दिल्लीत सत्ता स्थापन करता येईल का?
मुंडे : भाजपची ताकद उत्तर भारतातच असल्याचे आधी म्हटले जात होते. पण आता दक्षिणेतही भाजपची शक्ती वाढली आहे. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा भाजपमध्ये आले आहेत आणि तामिळनाडू, केरळमध्ये काही छोटे पक्ष भाजपबरोबर आहेत. नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकांवरून भाजपच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये १८० हून अधिक जागा असून त्यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रात ३५ हून अधिक जागा मिळतील.
मनसेने नऊ मतदारसंघात उमेदवार उभे केले असून त्यापैकी पुणे व भिवंडी येथे भाजपविरोधात आहेत. त्यांचा महायुतीच्या यशावर बरावाईट असा किती परिणाम होईल? नितीन गडकरी यांनी शिष्टाई केल्याने मनसेने भाजपविरोधात उमेदवार दिले नाहीत का?
मुंडे : मनसे आणि त्यांच्या उमेदवारांचा प्रभाव फारसा नसल्याने महायुतीच्या यशावर परिणाम होणार नाही. लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांना केली होती. पण त्यांनी ती ऐकली नाही. मनसेने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक भागातच उमेदवार उभे केले आहेत. गडकरी शिष्टाईमुळे नव्हे, तर राज्यात अन्यत्र त्यांची ताकदच नसल्याने भाजपविरोधात मनसेचे उमेदवार उभे नाहीत.
भाजपला मनसेचा भविष्यात पाठिंबा किंवा मदत लागेल का? विधानसभेसाठी मनसेला सोबत घेतले जाईल ?
मुंडे : एनडीएला बहुमत मिळण्याची खात्री असल्याने केंद्रात् सत्तास्थापनेसाठी मनसेची कोणतीही आवश्यकता नाही. भाजपची शिवसेनेशी युती असून मनसेच्या समावेशाबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. पण मनसेचा समावेश भविष्यात महायुतीत होईल, असे मला वाटत नाही. मी सुरूवातीला प्रयत्न केले होते. पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आता मनसेला महायुतीची दारे बंद आहेत.
केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यास तुम्हाला कोठे काम करायला आवडेल? शिवसेनेकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर तुम्ही उपमुख्यमंत्री होणार का? या पदांसाठी भाजपमध्ये कोणते नेते योग्य आहेत, असे वाटते?
मुंडे : मला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले पहायला आवडेल. उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांची तब्येत बरी नसते. तावडे, फडणवीस अशी नेतेमंडळी पक्षात आहेत. पण सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी राज्याचे नेतृत्व मुंबईने केले, असे आजवर कधी घडलेले नाही. ग्रामीण भाग आणि प्रश्नांची सखोल माहिती नेत्याला असणे आवश्यक असते.
तुम्हाला दिल्लीत काम करणे आवडेल की मुंबईत ?
मुंडे : पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास तयार आहे. राज्यात गृह, उर्जा, अर्थ ही खाती सांभाळली आहेत. पण दिल्लीत वातानुकूलित दालनात बसून मंत्रिपद भूषविण्यापेक्षा राज्यात जनतेसोबत राहून काम करणे अधिक आवडेल.
शरद पवार बीडमध्ये सर्व शक्ती पणाला लावून तुमच्याविरोधात प्रचार करीत आहेत. त्याचा किती परिणाम होईल?
मुंडे : मी देशात विक्रमी मते घेऊन जिंकून येईन.
पुतणे धनंजय मुंडे तुम्हाला सोडून गेल्याने मुलगी पंकजा यांना तुम्ही राजकारणात आणले. त्या तुमच्या राजकीय उत्तराधिकारी म्हणून अधिक योग्य वाटतात का?
मुंडे : धनंजय मुंडे सोडून गेल्यानंतर पंकजाच राजकीय वारसदार आहे. ती अपघाताने राजकारणात आली. माझ्या शब्दाखातर जावई व मुलगी परदेशातून येथे स्थायिक झाले. पंकजा तिचा मतदारसंघ व माझ्या प्रचाराची धुराही समर्थपणे सांभाळते. नेतृत्व, वक्तृत्व, राजकीय कसब व हुशारी ही तिची वैशिष्टय़े आहेत. माझे गुण तिच्यात पुरेपूर उतरल्याने तीच माझा राजकीय वारसा पुढे चालवेल, असा विश्वास आहे.
मन महाराष्ट्रातच रमते..
महाराष्ट्राच्या राजकारणात गेली ३६ वर्षे सक्रिय असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे एक रांगडे व्यक्तिमत्व. खेडय़ापाडय़ातील जनतेतही सहजपणे मिसळून जाणारे, व मुरब्बी राजकारणी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-04-2014 at 04:03 IST
TOPICSगोपीनाथ मुंडेGopinath MundeलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath munde delivered interview to loksatta