महाराष्ट्रात अल्पावधीतच प्रभावशाली ठरलेल्या मनसेला ‘रालोआ’ सोबत घेण्याचे स्वप्न ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दोन-अडीच वर्षांपूर्वी पाहिले. पण त्याच्या ‘पूर्ती’ मध्ये अनेक अडथळे उभे राहिले. अखेर मुंडे यांनी हे स्वप्नच संपविले, आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींचे ‘राज’ कारण सुरू झाले. आपण दोन भावांमध्ये संवादाचा पूल बांधू, असे गडकरी यांनी सांगितले खरे, मात्र ते वक्तव्य प्रदेश कार्यालयातील ‘चहाच्या पेल्यातच’ विरले. नरेंद्र मोदींच्या सत्तास्थापनेचा मार्ग सुकर करण्यासाठी नवा ‘राज’ मार्ग उभारण्याचे काम गडकरी यांनी हाती घेतले असून मुंडेंची ‘स्वप्नपूर्ती’ आता ‘पूल’करी गडकरी यांच्या हातून होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यावर पक्षाची ताकद झपाटय़ाने वाढली. त्यांच्या जाहीर सभांचा प्रतिसाद पाहून भाजपलाही भुरळ पडली. शिवसेनेचा प्रभाव पूर्वीइतका राहिला नसल्याचे जाणवत होते. आता सत्ता मिळवायची असेल, तर मनसेच्या मदतीशिवाय विरोधी पक्षांचे मतविभाजन टाळता येणार नाही, हे भाजप नेत्यांना उमगले. त्यामुळे मनसेला ‘रालोआ’ सोबत घेण्याची भूमिका मुंडे यांनी औरंगाबाद येथील मेळाव्यात आणि पक्षाच्या बैठकीतही जाहीरपणे मांडली. त्यानंतर अनेकदा राज ठाकरेंशी भेटीगाठी व चर्चा झाल्या. पण त्यांना अपेक्षित फळ मिळाले नाही. मुंडे यांनी मनसेला गळाला लावण्याचे प्रयत्न केल्यावर गडकरी यांनीही त्यासाठी पावले टाकायला सुरूवात केली. दोन्ही भावांमध्ये आपण संवाद घडविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे त्यांनीही सांगितले. पण उध्दव आणि राज ठाकरे यांनी आपल्या भूमिका सोडल्या नाहीत. उध्दव ठाकरेंचा विरोध कायम राहिला.
आता मनसेला लोकसभा निवडणुकीच्या िरगणातून बाहेर ठेवून नवा  ‘राजमार्ग’ उभारणीचे काम भाजपचे ‘राजकीय पक्ष बांधकाम मंत्री’ गडकरी यांनी हाती घेतले आहे. गुजरात दौऱ्यावर गेलेले राज ठाकरे मोदींनी केलेले काम पाहून प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी मोदींना पंतप्रधान पदासाठी जाहीर पािठबा देण्यासाठीच गडकरींनी विनंती केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडेही ‘अन्य पर्याय’ नसल्याने तेही भाजपच्या ‘गळाला’ लागण्याची चिन्हे असल्याने मुंडेंची ‘स्वप्नपूर्ती’ त्यांचे ‘घनिष्ट मित्र’ गडकरींकडून होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा