भाजपनेते नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘यापुढे महायुतीचे निर्णय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांच्याशीच चर्चा करून घेतले जातील’, असे जाहीर केले आहे. मात्र गेल्याच आठवडय़ात पुणे येथे एका उद्योगपतीच्या निवासस्थानी मुंडे यांनीही राज यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. ही भेट गुप्त राहिली अन्यथा गडकरींबरोबर मुंडे यांनाही टीकेचे धनी व्हावे लागले असते, असेही या सूत्रांनी सांगितले.
नाशिकमधील गोदापार्कच्या भूमिपूजनाचा सोहळा आणि मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे शिवसेनेत कमालीची नाराजी आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून गडकरी यांची ‘व्यापारी’ म्हणून संभावना करण्यात आली, त्याचप्रमाणे महायुतीचे निर्णय केवळ मुंडे यांच्याशीच बोलून घेतले जातील, असे सेनानेतृत्वाने जाहीर केले. मात्र, खुद्द मुंडे हेदेखील गेल्या आठवडय़ात राज यांना भेटल्याचे समजले आहे. पुण्यात एका उद्योगपतीच्या निवासस्थानी मुंडे आणि राज यांच्यात गुप्त बैठक झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. या भेटीचा पत्ता न लागल्याने मुंडे सेनानेतृत्वाच्या रागापासून बचावल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात गोपीनाथ मुंडे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
मनसेला महायुतीत घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळालेल्या मतांमुळे सेना-भाजपच्या किती जागा पडल्या तसेच मनसेला महायुतीत घेतल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवरून घालवता येईल, अशी भूमिका सर्वप्रथम मुंडे यांनीच भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडली होती. मुंडे यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या अन्य नेत्यांनीही वेळोवेळी राज यांची भेट घेऊन महायुतीत येण्याचे आवाहन केले. मात्र सेना-भाजपकडून कोणताही ठोस प्रस्ताव मांडण्यात आलेला नसल्यामुळे यावर मी कोणताही भूमिका मांडू शकत नाही, असे राज यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.
दरम्यानच्या काळात स्वाभिमानी शेतकरी पक्षाला महायुतीत घेतल्यानंतर आता मनसेला महायुतीचे दरवाजे बंद, असे शिवसेना नेतृत्वाने जाहीर केले. मात्र, गडकरी आणि मुंडे यांनी स्वतंत्रपणे राज यांची भेट घेऊन अप्रत्यक्षपणे शिवसेना नेतृत्वालाच धक्का दिल्याचे बोलले जात आहे.