राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हीना यांनी अखेर बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू होती. दिल्लीत भाजप मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत हीना गावित यांनी भाजपत प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री जगदंबिका पाल यांनी काँग्रेसला तर अभिनेते राजू श्रीवास्तव यांनी समाजवादी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला.
सकाळपासूनच डॉ. हीना भाजप मुख्यालयात येणार असल्याच्या वावडय़ा उठत होत्या. सायंकाळी चार वाजता डॉ. हीना भाजप मुख्यालयात येतील, असे मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले. डॉ. हीना यांना मुख्यालयात आणण्याची जबाबदारी तावडे व महाजन यांच्यावर सोपवण्यात आली होती. दुपारी साडेचार वाजता हीना ११ अशोका रस्त्यावर अवतरल्या. त्यानंतर त्यांनी राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. हीना यांच्यासमवेत डॉ. विजयकुमार गावितदेखील भाजपत प्रवेश करणार का, या प्रश्नावर बोलण्याचे मात्र भाजप नेत्यांनी टाळले. हीना म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांनंतरही आदिवासी भागात अनेक समस्या आहेत. कुपोषण, अन्नाची वानवा, पिण्याचे पाणी अशा प्राथमिक गरजांचीदेखील पूर्तता झाली नसल्याचा आरोप करीत हीना यांना अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादीवर शरसंधान केले. आदिवासी भागातील युवकांना महाराष्ट्रात रोजगार नसल्याने त्यांना गुजरातमध्ये स्थलांतरित व्हावे लागते. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय स्वत:चा असून नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे हीच आपली इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.
जगदंबिका पाल यांचे स्वागत करताना राजनाथ सिंह म्हणाले की, पाल यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करून विकासाला साथ दिली आहे. भाजपने पाल यांना अधिकृत उमेदवारी लगेचच घोषीत केली नसली तरी, त्यांना दोमारियागंजमधून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. नव्या व जुन्या-जाणत्या नेत्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याने काँग्रेसमध्ये थांबण्याची इच्छा नव्हती, असे पाल यांनी या वेळी सांगितले. राजू श्रीवास्तव यांना तर समाजवादी पक्षाने कानपूरमधून उमेदवारी दिली होती. परंतु उमेदवारी स्वीकारण्यास नकार देत श्रीवास्तव सपातून थेट भाजपमध्ये सामील झाले. निवडणूक लढविण्यास उत्सुक नसलो; तरी पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारणार, असे सूचक वक्तव्य श्रीवास्तव यांनी केले.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा डॉ. हीना यांच्या भाजपप्रवेशाला विरोध होता. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी डॉ. हीना यांच्यासाठी पायघडय़ा अंथरल्या. पक्षात प्रवेश केल्याशिवाय हीना यांना अधिकृत उमेदवारी देऊ नये, असा आग्रह खडसे यांनी धरला होता. मुंडे यांनी जबाबदारी स्वीकारल्याने हीना यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला.

Story img Loader