लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या भवितव्याचा प्रश्न दिल्लीवर सोपविण्यात आला आहे. मुख्यमंत्री बदलाची शक्यता पक्षाच्या वर्तुळातून स्पष्टपणे फेटाळण्यात येत आहे.
काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत मुख्यमंत्री लक्ष्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या आधी प्रदेशची बैठक झाल्याने कोणता निर्णय घ्यायचा याबाबत नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या बैठकीतून पक्षांतर्गत गटबाजीचे चित्र समोर येऊ नये म्हणून दिल्लीतूनही सूचना आल्या होत्या. परिणामी आजच्या बैठकीत कोणालाच बोलण्याची संधी देण्यात आली नाही. जनतेचा कौल मान्य करून केंद्रीय नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात येत असल्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
पक्षसंघटनेत फेरबदल करण्याचे संकेत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर जनार्दन द्विवेदी यांनी दिले. यामुळेच राज्य काँग्रेसच्या संघटनेत बदल होऊ शकतो, असा अर्थ काढण्यात येत आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या विरोधात नाराजी असली तरी त्यांना बदलण्याचा निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला बदलल्यास पक्षाला अन्य सात राज्यांबाबत निर्णय घ्यावा लागेल, याकडे पक्षाच्या एका नेत्याने लक्ष वेधले. पक्षाच्या कार्यकारिणीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. यामुळे महाराष्ट्रात फार काही बदल होण्याची शक्यता फेटाळण्यात येत आहे.
पराभवाची जबाबदारी मी व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली असून, पक्षाबाबत जो काही निर्णय पक्षाने घ्यावा, असे ठाकरे यांनी सांगितले. २१ व २३ या तीन दिवसांत सर्व मतदारसंघांमधील उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, खासदार-आमदारांकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर मंत्री, आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेतली जाईल. या आढावा बैठकांमधून कोणत्या त्रुटी राहिल्या याचा अंदाज येईल, असेही ठाकरे यांनी सांगितले. पराभवाच्या पाश्र्वभूमीवर चिंतन बैठक घेण्याची मागणी प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली होती. पराभवाचे निश्चितच आत्मपरीक्षण करावे लागेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.  पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा संदेश बैठकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. दिल्ली जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
नारायण राणे आणि नितीन राऊत या दोन मंत्र्यांनी स्थानिक पातळीवरील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर मंत्रिपदाचे राजीनामे दिले होते. या दोघांनाही सरकारमध्ये काम करण्यास सांगण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा