विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीकरिता दोन जागा निवडून आणण्याची क्षमता असताना राष्ट्रवादीने तीन उमेदवारांची नावे जाहीर केल्याने रंगत वाढणार हे निश्चित झाले आहे. जे जास्तीत जास्त आर्थिक ताकद जास्त लावतील, त्यांचाच नववा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे चुरशीच्या या निवडणुकीत अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या आमदारांचा ‘भाव’ वाढला आहे.
२० मार्चला होणाऱ्या विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी पहिल्या फेरीत निवडून येण्याकरिता २९ मतांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे ६२ आमदार असून, १२ अपक्षांचा पाठिंबा आहे. तीन उमेदवार निवडून आणण्याकरिता ८७ मतांची आवश्यकता भासणार आहे. याचाच अर्थ राष्ट्रवादीला १३ मते बाहेरून मिळवावी लागतील. मनसेचा पाठिंबा मिळाल्यास राष्ट्रवादीला सोपे जाईल. काँग्रेसचे ८३ आमदार असल्याने अपक्षांच्या मदतीने तीन उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. पण काँग्रेसमधील अस्वस्थता लक्षात घेता तिन्ही उमेदवार निवडून येण्याकरिता खबरदारी घ्यावीच लागेल.
भाजप-शिवसेना युतीचे ९३ आमदार असल्याने युतीचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. शिवसेनेने दोन उमेदवार उभे करण्याचे जाहीर केल्याने भाजपच्या वाटय़ाला एकच जागा येईल. विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर हे भाजपचे दोन सदस्य निवृत्त होत आहेत. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेने भाजपला लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नमते घ्यावे लागणार आहे. पहिल्या पसंतीच्या मतांनंतर भाजपकडे १८ मते अतिरिक्त ठरतात. मनसेने पाठिंबा दिल्यास भाजपचा दुसरा उमेदवार निवडून येऊ शकतो. अर्थात, मनसेही आपले पत्ते लगेचच खुले करण्याची शक्यता नाही.

टकले, पावसकर, आनंद ठाकूर राष्ट्रवादीकडून  
राष्ट्रवादीने हेमंत टकले, आणि शिवसेनेतून आलेल्या किरण पावसकर यांना फेरउमेदवारी दिली आहे. टकले हे शरद पवार यांचे तर पावसकर अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात. ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आनंद ठाकूर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर भारतीय असलेले ठाकूर ठाणे जिल्ह्य़ाच्या आदिवासी पट्टय़ात कार्यरत आहेत.

शिवाजीराव देशमुख यांना फेरउमेदवारी ?
काँग्रेसमध्ये विधान परिषदेचे सभापती आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य शिवाजीराव देशमुख यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तब्येत साथ देत नसली तरीही देशमुख यांनाच संधी मिळेल, अशी चिन्हे आहेत. अन्य दोन जागांसाठी चुरस पक्षात आहे.