विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील राजकीय पक्षांमधील भाऊरायांचा उर भगिनीप्रेमानेभरून आला असून राजकीय रक्षाबंधनास ऊत आला आहे. फलकबाजी करीत राखी बांधण्यासाठी आवताण देत बहिणींची संख्या वाढविण्यावर नेते मंडळी भर देत असून त्यासाठी ठिकठिकाणी मोठे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. मनसेचे आमदार राम कदम २४ जुलैपासूनच राखी बांधून घेण्यास सुरुवात केली आहे. ‘येताना फक्त धागा घेऊन या’ असे सांगत यंदा ६० हजार भगिनींकडून राखी बांधून घेण्याचा विक्रमी संकल्प त्यांनी सोडला आहे.
घाटकोपर येथील राम कदम यांच्या निवासस्थानी २४ जुलैपासून रक्षाबंधनाचा सोहळा सुरू झाला आहे. घाटकोपरमधील विविध विभागांमध्ये राम कदम यांनी खास पास दिले असून भगिनींनी राखी बांधावयास कोणत्या दिवशी, किती वाजता यायचे याची माहिती त्यावर नमूद केली आहे. ‘रक्षाबंधनासाठी येताना सोबत शिलाईचा धागा घेऊन यावे’, असे आवाहन त्यांनी आपल्या तमाम भगिनींना केले आहे. ‘गेल्या वर्षी तब्बल २०,५०० भगिनींनी मला राखी बांधली होती. त्यावेळी नियोजनाच्या अभावामुळे गर्दी झाली. तसा प्रकार घडू नये यासाठी यंदा काळजी घेतली आहे. नियोजित वेळेत येऊन भगिनी राखी बांधत असून आतापर्यंत सुमारे ४४ हजार भगिनींनी त्यांना राखी बांधली. येत्या तीन-चार दिवसांत १६ हजार बहिणी राखी बांधण्यासाठी येणार आहेत’, असे राम कदम यांनी सांगितले.
तिकडे नवी मुंबईतील ऐरोलीत संजुभाऊ वाडे यांनी आपल्या विभागात भावा-बहिणीचे नाते घट्ट करण्यासाठी शनिवारी रक्षाबंधनाचा जाहीर सोहळाच आयोजित केला होता. ऐरोलीतील सेक्टर – १५ मधील अष्टविनायक व शिवशक्ती सोसायटीजवळ शनिवारी हा सोहळा पार पडला. ‘संजुभाऊ वाडे आधार आपल्या प्रभागाचा’ अशी फलकबाजी करीत या सोहळ्यात प्रभागातील भगिनींना साद घालण्यात आली होती. संजुभाऊंची साद ऐकून प्रभागातील अनेक भगिनी या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेऊन असलेल्या अनेक भाऊरायांचे भगिनीप्रेम उतू चालले असून आश्रम, संस्था, विभागातील गरीबाघरच्या लेकींकडे जाऊन राखी बांधून घेतल्याचे प्रकारही घडले. आता या रक्षाबंधनातून मतांच्या राजकारणाचे बंध किती घट्ट होतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.