मुलगी भाजपच्या वतीने लढल्यास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी केली जाईल किंवा मी ज्याच्या मागे उभा राहतो तो ‘डमी’ नव्हे तर खराच असतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भोवताली निर्माण झालेले संशयाचे वाताावरण दूर करण्याचा सोमवारी प्रयत्न केला.
विधान परिषद निवडणुकीत माघार घेतलेले शिवसेनेचे राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना मावळ मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आली. लक्ष्मण जगताप यांना पक्षाची उमेदवारी दिली जाणार होती, पण त्यांनी शेकापच्या मदतीने निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. विधान परिषदेची पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ किंवा गेल्या वेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप यांना अपक्ष उभे करून राष्ट्रवादीने त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. हाच प्रयोग मावळ मतदारसंघात केला जाणार असल्याची चर्चा आहे. यातूनच राहुल नार्वेकर यांना ‘डमी’ म्हणून उभे करण्यात आल्याची चर्चा आहे. यामागे अजित पवार यांचेच राजकारण असल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जाते. पण अजित पवार ज्याच्या मागे उभा राहतो तो डमी असतो की खरा, हे काळच ठरवेल, असे सांगत आपण नार्वेकर यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. नंदुरबार मतदारसंघात वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या भाजपच्या वतीने लढणार आहे. दोनच दिवसांपूर्वी गावित कन्येने भाजपचा झेंडा हाती घेऊन तसे संकेत दिले. डॉ. गावित यांचा काँग्रेस विरोध जगजाहीर आहे. पण त्यांना अजितदादांचा पाठिंबा असल्याचा संशय काँग्रेसमध्ये होता.
डॉ. विजयकुमार गावित हे मुलीला भाजपकडून उभे करण्याची चूक करणार नाहीत. पण त्यांनी तशी चूक केलीच तर ज्या क्षणी त्यांची मुलगी भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करेल तेव्हा डॉ. गावित यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे गेलेले असेल, असेही अजितदादांनी स्पष्ट केले. डॉ. गावित यांना आपण पाठीशी घालणार नाही हा संदेश अजितदादांनी दिला.
शिवसेना मागासवर्गीय, दलित विरोधी
शिवसेनेचे अनेक नेते वा लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यांची संख्या किंवा नावे कळली तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची झोप उडेल, असे अजित पवार यांनी खोचकपणे सांगितले. अमरावतीमधील नवनीत कौर राणा किंवा शिर्डीतील भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात अपप्रचार किंवा त्यांच्या अंगावर जाणे हे सारे प्रकार म्हणजे शिवसेना दलित किंवा मागासवर्गीय उमेदवारांच्या विरोधात जाणूनबुजून हे सारे घडवून आणत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.
गावितकन्या डॉ. हिना भाजपच्या वाटेवर..
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कधी जाहीर होणार याविषयी स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था असून वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हिना गावित यांचे नाव उमेदवारीच्या स्पर्धेत आहे. १८ मार्च रोजी त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता असून तूर्तास डॉ. विजयकुमार गावित हे राष्ट्रवादीमध्येच राहतील. राष्ट्रवादीकडून त्यांच्या विरोधात कारवाई झाल्यास मग त्यांच्यापुढे भाजप प्रवेशाचा पर्याय खुला राहील, अशी माहिती मिळते. तसेच डॉ. हिना यांच्या उमेदवारीआड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आल्यास अन्य उमेदवार भाजपकडून उभा करून राष्ट्रवादीची सर्व छुपी ताकद त्या उमेदवारामागे लावण्याची रणनीती डॉ. विजयकुमार गावित यांच्या गोटातून आखली जात आहे.
सलग नऊ वेळा या मतदारसंघाने काँग्रेसचे खा. माणिकराव गावित यांना साथ दिली आहे. ते दहाव्यांदा निवडून आल्यास एकाच पक्षाकडून सलग दहा वेळा विजयी होण्याच्या विक्रमाची नोंद होईल. त्यामुळे या मतदारसंघाकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे लक्ष लागून आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत डॉ. हिना गावित यांचे नाव जाहीर झाले होते. मात्र सावरासावर करण्यात येऊन नाव मागे घेण्यात आले होत़े
दुसरीकडे या सर्व राजकीय घडामोडींनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच दाखल झालेल्या डॉ .विजयकुमार गावित यांनी रविवारी आपल्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते स्वत: राष्ट्रवादीमध्येच राहणार असलो तरी हिना मात्र भाजपच्या वाटेवर असल्याने तिला कुठल्या प्रकारची मदत होईल याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेही डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीसाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे.