‘घरात नाही मीठ आणि कशाला हवे विद्यापीठ’ किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निजामाचे हस्तक होते, अशी विधाने दलित समाजाला हिणवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. दलित समाज हा अपमान कदापि सहन करणार नाही, असा दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बुधवारी केला. कवाडे यांच्या पक्षाबरोबरच बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखा कुंभारे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. कवाडे आणि कुंभारे यांच्या पाठिंब्यामुळे प्रचारात काँग्रेसला निळे झेंडे लावण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच या नेत्यांच्या पाठिंब्यामुळे नागपूर आणि रामटेकमध्ये काँग्रेस उमेदवारांचा फायदा होईल. जातीयवादी पक्षांना रोखण्याच्या उद्देशानेच आपल्या पक्षाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याचे कवाडे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत जागा मिळण्याची शक्यता नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा कवाडे यांनी व्यक्त केली. माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी पाठिंबा जाहीर करताना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी काँग्रेस मदत करील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा