राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचा गुरुवारी राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. डॉ. विजयकुमार गावित यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर आव्हाड यांची वर्णी लावण्यात आली व त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
राजभवनावर गुरुवारी झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपालांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने हा बदल केल्याचे मानले जाते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला आपली प्रतिमा बदलण्यात त्याचा काहीही फायदा होणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यश्र देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.