शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात युवासेना अध्यक्ष म्हणून तलवार उपसून दाखवणे वेगळे आणि आपल्या सेनेचे शिलेदार सांभाळणे वेगळे याचा कटू अनुभव घेण्याची वेळ आदित्य ठाकरे यांच्यावर एकाच आठवडय़ात दोनवेळा आली. युवासेनेचे अभिजित पानसे आणि राहुल नार्वेकर यांनी शिवबंधनचा धागा तोडून मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये केवळ प्रवेशच केला नाही तर त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने युवासेनेच्या कारभाराबाबतप्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
खरेतर अभिजित पानसे व राहुल नार्वेकर हे आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेतील बिनीचे शिलेदार होते. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेने लाँच के ल्यानंतर विद्यापीठ निवडणुकीतील यश असो की अन्य काही संकल्पना असो अभिजित पानसे यांनी सर्व श्रेय आदित्य ठाकरे यांना दिले. राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर विद्यार्थी सेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अभिजित पानसे यांच्यावर सोपवली होती व त्यांनीही अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी सेनेचे स्थान अबाधित ठेवण्याचे काम केले होते. युवासेनेच्या स्थापनेनंतर पानसे यांच्यावर चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली खरी परंतु थोडय़ाच कालावधित तेथून हटवून आदेश बांदेकर यांना चित्रपट सेनेचा अध्यक्ष करण्यात आले. यानंतर गेले वर्षभर पानसे यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली तर नाहीच परंतु त्यांना सेनेतील प्रवाहापासून दूर ठेवण्याचेच काम सेनेतील चाणक्यांनी केले. याकाळात राहुल नार्वेकर यांच्यावर मात्र उद्धव यांनी केवळ विश्वासच दाखवला नाही.तर आदित्य ठाकरे यांची जबाबदारी सोपविली होती.
शिवसेना व युवासेनेचे प्रवक्तेपदही राहुल यांना देण्यात आले होते. तसेच यापूर्वीही त्यांना विधानसभा उमेदवारी देऊन ते पराभूत झाल्यानंतरही उद्धव यांच्या विश्वासातील असल्यामुळेच विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र शिवसेनेत आपला अपेक्षाभंग झाल्याचे सांगत नार्वेकर थेट राष्ट्रवादीच्या गडावर दाखल झाले.
पानसे यांनी मनसेत प्रवेश करताच त्यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तर नार्वेकर यांना मावळ येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवबंधनाचा धागा तोडून यापूर्वीच शिवसेनेच्या चार खासदार व एका माजी खासदाराने सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केले हा सेनेसाठी मोठा धक्का असतानाच आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेलाही खिंडार पडल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली असून युवासेनेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह पक्षातच उपस्थित होताना दिसत आहेत.