भाजपपेक्षाही काँग्रेसमध्ये सध्या जेष्ठांची वाईट अवस्था असून ‘गरज सरो नि वैद्य मरो’ अशी वागणूक त्यांना दिली जात आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीला सोडताना पक्षाने साधे विचारलेही नाही. त्यामुळे आता कारवाई करून दाखवाच, असे खुले आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी पक्षाला दिले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीला बहाल केला असून त्यातही आपले प्रतिस्पर्धी सुनील तटकरे यांना मैदानात उतरविण्यात आल्याने संतप्त झालेल्या अंतुले यांनी दोनच दिवसांपूर्वी पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर शेकापचे रमेश कदम यांना त्यांनी पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यावर अंतुले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देत प्रदेश काँग्रेसने याबाबतचा अहवाल श्रेष्ठींना पाठविला आहे. त्यामुळे खवळलेल्या अंतुले यांनी आज पक्षालाच खुले आव्हान दिले. आपल्यावरील कारवाईची पर्वा नाही. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून काँग्रेसने रायगडची दफनभूमी केली असून आता तटकरेंचे राजकीय दफन गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपले बोट धरून सुनील तटकरे राजकारणात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊ खानविलकरांना बाजूला सारून तटकरेंना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले, हे आपलेच पाप असल्याचेही अंतुले म्हणाले. आपल्याच दिल्लीतल्या घरी इंदिरा काँग्रेसची स्थापना झाली होती आणि आज माझीच हकालपट्टी होत असेल तर मी काय बोलणार, अशी खंत अंतुले यांनी व्यक्त केली.
ज्या तटकरेंकडे पहिल्या निवडणुकीच्या वेळी खर्चाला पसे नव्हते म्हणून आपण सर्व खर्च केला होता. त्याच तटकरेंच्या मालकीच्या आज १५० कंपन्या आहेत, हे ऐकून आपण थक्कच झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader