कल्याण, डोंबिवलीत कोणतीही निवडणूक असली तरी शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारात एक चेहरा ठरलेला असायचा आणि तो म्हणजे मनोहर जोशी यांचा. या सर्व परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारा वर्ग नेहमीच प्रभावी ठरत असला तरी युतीच्या उमेदवारासाठी प्रचाराचा नारळ वाढविताना जोशी सरांची उपस्थिती अनिवार्य असायची. यंदाच्या निवडणुकीत नेमके उलट चित्र दिसू लागले असून युतीच्या विरोधात अतिशय पद्धतशीरणे हे ‘जोशी कार्ड’ चालविण्याचा प्रयत्न विरोधकांनी आणि विशेषत राष्ट्रवादीने सुरू केले आहेत. शिवसेनेत ब्राम्हणांवर सातत्याने अन्याय होतो, असा प्रचार चलाखीने सुरु असून ‘सरांना बघा कसे अपमानीत केले गेले’, हा मुद्दा ठसविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जात असून दसरा मेळाव्याच्या चित्रफीतीही दाखविल्या जात आहेत. मोदींचा विचार करण्यापुर्वी ‘जोशी-परांजपें’चा अपमान मोडून काढा, अशी या प्रचाराची ‘लाईन’  असून हा प्रचार मोडून काढण्याचे मोठे आव्हान पुढील काळात युतीला पेलावे लागणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुक यंदा कधी नव्हे इतकी जातीय समिकरणांनी बांधली गेली असून या मतदारसंघात एकगठ्ठा असलेल्या ब्राम्हण, आगरी, मुस्लीम समाजातील मतांचे ध्रुवीकरणाचे प्रयत्न  सुरु आहेत. या निवडणुकीत कल्याण, डोंबिवलीतील परांपरागत मतदारांवर युतीच्या उमेदवाराची भीस्त आहे. डोंबिवलीत संघाला मानणारा एक मोठा वर्ग वास्तव्यास असून यापुर्वीच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत हा मतदार युतीच्या उमेदवाराला एकगठ्ठा मतदान करतो, असे दिसून आले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत युतीच्या परांपरागत मतदारसंघात मनसेने मुसंडी मारल्याने शिवसेनेपुढील डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा भेटीगाठी घेण्याचा धडाका लावल्याचे चित्र आहे. नेमके हेच हेरुन राष्ट्रवादीतील एका गटाने डोंबिवलीत ‘जोशी कार्ड’ चालविण्यास सुरुवात केली असून ब्राम्हण समाजाच्या काही बैठकांमध्ये शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात मनोहर जोशींना कसे अपमानीत केले गेले, याच्या चित्रफीत दाखवली जात असल्याने उपस्थितही आवाक झाल्याचे बोलले जाते.
मुख्यमंत्री राहीलेले मनोहर जोशी यांना दसरा मेळाव्यात ज्याप्रकारे अपमानीत करण्यात आले ते सगळ्यांची पाहीले आहे. ठाण्यात भाजपच्या मिलींद पाटणकरांना शिवसैनिकांना मारहाण केली. मला पक्षातून बाहेर जाणे भाग पाडले. ब्राम्हण समाजाला शिवसेनेत कशी वागणूक मिळते हे स्पष्ट असताना मी वेगळा प्रचार करण्याची गरजच काय, असा सवाल आनंद परांजपे यांनी लोकसत्ताशी बोलताना उपस्थित केला. मी कोणतीही चित्रफीत तयार केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रधर्माला प्राधान्य
आताची निवडणूक ही या परिवर्तनाची चाहूल आहे. त्यामुळे खचलेल्या गटाकडून काहीही वावडय़ा उठवून ब्राम्हणांमध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे डोंबिवलीतील एक ज्येष्ठ उद्योजक व संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मधुकर चक्रदेव यांनी सांगितले.

Story img Loader